जेवणावळीतून होतोय मत परिवर्तनाचा प्रयत्न

0

नंदुरबार (रविंद्र चव्हाण) । नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांकडून दिल्या जाणार्‍या जेवणावळीतून मतपरिवर्तनाचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ओल्या सुक्या पार्ट्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढताना दिसतोय ही बाब गंभीर असून सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. आचारसंहिता पथकाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे अशा पार्ट्या दिवसेंदिवस अधिकच रंगत आहे.

अल्पवयीन मुलांचा सहभाग गंभीर
नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेला पेाहचली आहे. प्रचाराची रॅली, कॉर्नरसभा यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणूक कार्यात प्रत्यक्ष अप्रत्य सहभाग नोंदविणार्‍या कार्यकर्त्यांबरोबरच प्रभागातील नागरिकांचीही उमेदवार काळजी घेताना दिसत आहे. अशा नागरिकांना अथवा कार्यकर्त्यांना दररोज जेवणावळी दिल्या जात असून ओल्या सुक्या रंगीत संगीत पार्ट्यांची मेजवानी देण्याची व्यवस्था होऊ लागली आहे. त्यासाठी फॉर्म हाऊस, हॉटेल, शेत आदी ठिकाणी य पार्ट्या रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे अशा जेवणावळीत 17 ते 18 वर्ष वयोगटातील मुलंही सहभागी होत आहेत. त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हा विषय गंभीर असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तरूण व अल्पवयीन मुलांना दारूचे व्यसन लागण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.

इकडचे कार्यकर्ते उद्या तिकडे
निवडणुकमय वातावरण असल्याने सारेच आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे. शंभराहून अधिक उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. त्यामुळे किमान पाच हजाराहून अधिक मतदारांना दारू आणि जेवणाच्या पार्ट्यांची व्यवस्था होत आहे. पुर्वी केवळ थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून जेवण दिले जात असे. पण आता प्रभागातील सर्व मतदारांना आमत्रंण देऊन जेवणावळीला बोलावले जात असल्याची प्रथा सुरू झाली आहे. ज्या उमेदवाराच्या पार्टीसाठी कार्यकर्ते हजेरी लावतात तेच कार्यकर्ते उद्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या जेवणावळीत हजर असून त्या पार्टीचा आस्वाद घेताना दिसत आहे. एकंदरीत अशा जेवणावळींचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करून मतपरिवर्तनाचा प्रयत्न होत असून ही बाब गंभीर आहे.