काटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले; पवार दाम्पत्याने घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
बारामती : (वसंत घुले) होय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीच्या उमेदवारांसाठी मुलाखती घेतात…. अजितदादांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार पुन्हा याच काटेवाडी ग्रामपंचायतीच्या त्याच उमेद्वारांसाठी पुन्हा मुलाखती घेतात…. यानंतर विरोधकांना एकेरी भाषा वापरण्याचा कार्यक्रमही होतो. तसेच माझे सर्व कुटुंबीय काटेवाडीच्या ग्रामपंचायतीसाठी चार दिवस येथेच असेल असेही पवार कार्यकर्त्यांना सांगतात.
ग्रामपंचायत निवडणुकीची पवारांनी घेतली धास्ती
बारामती तालुक्यातील काटेवाडी या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. ही ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात रहावी यासाठी अजित पवार यांनी आपला वेळ खर्ची करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये चांगलेच चैतन्य निर्माण झाले आहे. एवढी जय्यत तयारी ग्रामपंचायतीसाठी पवारांना करावी लागत आहे. याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पैशाचा धूर निघणार हे स्पष्ट होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीची लोकसंख्या नऊ हजाराच्यावर असून, सहा हजार शंभर मतदार आहेत. एकूण पाच वॉर्ड असून पंधरा उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. सरपंचपद हे जनतेतून निवडून द्यायचे आहे, त्यामुळे पवारांनी याची धास्ती घेतलेली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीसारख्या निवडणुकीत दोन दोनवेळा मुलाखती घ्याव्या लागतात याचे आश्चर्य वाटते आहे.
पालकमंत्री गिरीश बापटांना घालावे लागणार लक्ष
सरपंचपद हे खुल्या वर्गासाठी असून, चुरस अधिकच निर्माण झाली आहे. नवीन मतदार हे चारशेच्यावर असून, या चारशे मतदारांवरती ग्रामपंचायतीचे भवितव्य ठरणार आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीत विरोधकांनीदेखील तेवढीच तगडी तयारी केलेली आहे. विरोधकांकडे चांगले उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत व मतदारांचा कल लक्षात घेता विरोधकांना ग्रामपंचायत ताब्यात घेण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे बारामती तालुक्यात काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी नेमकी काय भूमिका घेतात. याकडेही लोकांचे लक्ष आहे. विरोधी पॅनल हा भाजपचाच आहे, त्यामुळे गिरीश बापटांना लक्ष द्यावे लागेल, असे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे बापट हे तालुका पदाधिकार्यांना सक्रिय करतील काय? हेही महत्त्वाचे आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहता व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे अवलोकन केले असता, बारामती तालुक्यातील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे तालुका पदाधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याचे जाणवले आहे.