जेव्हा अवघड होते जगणे

0

जेव्हा अवघड होते जगणेरामराज्याची स्वप्न दाखवणार्‍यांनी सध्या सर्वसामान्य माणसाचे जगणेच अवघड केले आहे. चोहोबाजूने बसणारे चटके सहन करण्याशिवाय आज आम आदमीकडे दुसरा पर्यायच राहिलेला नाही. माझ्यावर अन्याय होतोय, मला जगणे असह्य होऊ लागले आहे, अशी ओरडसुद्धा तो करू शकत नाही. केवळ घुसमट सुरू आहे. जो सद्यःस्थिती मांडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला तोंड बंद करण्यास भाग पाडले जात आहे. खुद्द सरकारमधील मंत्रीसुद्धा लोकांचे दु:ख ऐकण्यास तयार नाहीत. देशातील सर्वात मोठा मेगा एक्स्प्रेस वे आम्ही कसा बांधला याचे कौतुक करून स्वत:ची पाठ थोपटून घेतली जात आहे. देशातील प्रत्येक घटक विविध समस्यांना समोर जात असताना बुलेट ट्रेन आणि सर्वात मोठा मेगा एक्स्प्रेस वे कुणासाठी उभारला जात आहे, हाच प्रश्‍न आहे.

लाखोंचा पोशिंदा म्हणून जो ओळखला जातो, तो शेतकरी आज प्रचंड गांजला आहे. त्याला जीवन जगताना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संघर्ष करावा लागत आहे. जगण्याचा हा संघर्ष सुरू असताना अनेकदा अपयश आल्यानंतर टोकाचे पाऊल उचलून बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील शेतकर्‍यांनी लाँग मार्च काढून मुंबईतील विधानभवनावर धडक दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासनांची पुडी सोडून जमलेल्या हजारो शेतकर्‍यांची बोळवण केली होती. पायी चालत आलेल्या या शेतकर्‍यांपैकी काही जणांच्या पायातून रक्त वाहत होते. या रक्ताचीही खिल्ली उडवली गेली. तुम्ही शेतकर्‍याची खिल्ली उडवता. पेट्रोल-डिझेलच्या वाढणार्‍या दरांबद्दल बोलणार्‍या सामान्य माणसांना मूर्ख ठरवता. तुमच्यातील उणिवा दाखवणार्‍यांना तुम्ही देशद्रोहीसुद्धा ठरवता. त्यामुळे या देशातील प्रत्येक माणूस तुम्हाला निरुपयोगी वाटू लागला की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. काँग्रेसला अशाप्रकारे सत्तेचा माज चढण्यासाठी तब्बल 70 वर्षे लागली. यांनी मात्र चार वर्षांतच काँग्रेसची बरोबरी करून आम्ही तुमच्यापेक्षा किती तयारीचे आहोत, हेच दाखवून दिले आहे.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर केंद्र असो की राज्य सरकार, दोन्हींकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले जात असताना दिसत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र शेतकर्‍यांनी मोर्चे काढले. पण, हे मोर्चे प्रायोजित असल्याचा आरोप करत शेतकर्‍यांना नक्षलवादी ठरवण्याचा घोर अपराधही सत्ताधार्‍यांनी केला. संतापलेला बळीराजा अजून शांत झालेला नाही. अजूनही तो या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी सरसावत आहे. पावसाने झोडपले आणि राजाने मारले, अशा स्थितीचा सामना करणारा बळीराजा कधी उग्ररूप धारण करेल हे सांगता येणार नाही. आताही शेतकर्‍यांच्या संघटनेने 1 ते 10 जूनदरम्यान संपाची घोषणा केली आहे, शिवाय 10 जूनला भारत बंदचे आवाहन केले आहे. सरसकट कर्जमाफी, हमीभाव, अल्पभूधारक शेतकर्‍यांना उत्पन्नाची हमी, शेतपंपासाठी मोफत वीज, दुधाला 50 रुपये भाव, आदी प्रलंबित मागण्या आहेत. 1 जूनपासून देशव्यापी संपाला सुरुवात, 5 जूनला सरकारचा धिक्कार दिवस, 6 जून रोजी मंदसौर, मध्य प्रदेश येथे गतवर्षी गोळीबारात शहीद झालेल्या शेतकर्‍यांना श्रद्धांजली, 8 जून रोजी असहकार आंदोलन, 9 जूनला लाक्षणिक उपोषण, 10 जूनला भारत बंद, असे या आंदोलनाचे स्वरूप आहे. देशातील 22 राज्यांत हा संप होणार आहे. देशातील शेतकर्‍यांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशाप्रकारे रस्त्यावर उतरण्यास भाग पाडणारे सरकार उद्योगपतींची मात्र मर्जी राखताना दिसते. सुरुवातीपासूनच या सरकारने शेतकर्‍यांना सापत्न वागणूक दिली आहे. महाराष्ट्र राज्य तर यापेक्षाही पुढे गेले आहे. येथे तर बळीराजाची खिल्ली उडवण्याचेही प्रकार सुरू आहेत. जो सर्वात मोठा घटक म्हणून ओळखला जातो तो बळीराजा आज गांजलेला आहे.

दुसरीकडे रोजगार, नोकर्‍या नसल्याने तरुण भरकटू लागले आहेत. धर्म-जात अशा मुद्द्यांवर तरुणांची मने दूषित केली जात आहेत. नोकर्‍या नसल्याने किंवा असलेली नोकरी गेल्याने अनेक ठिकाणी आत्महत्यांसारखे प्रकार घडत आहेत. आयटीसारख्या समृद्ध समजल्या जाणार्‍या क्षेत्रातही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल तरुण उचलत आहेत.

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हा तर देशातील सध्याचा सर्वात मोठा प्रश्‍न. सर्व राज्यांनी मनावर घेतले तर दर कमी होतील, अशी लोणकढी थाप प्रत्येकवेळी मारली जाते. देशातील बहुतांश राज्यात भाजपचेच सरकार आहे. मग, सरकारला तातडीने आपल्या राज्यांना हे आदेश का देता येत नाहीत. पेट्रोलचा दर आज 86 रुपयांच्या पलीकडे गेला आहे, तर डिझेल 72 रुपयांचे पुढे. दुचाकीसुद्धा सर्वसामान्य माणसाला परवडत नाही, अशी स्थिती आहे. आता तर मालवाहतूकदारांनी भाडेवाढ करण्याचे जाहीर केले आहे. तब्बल 20 ते 25 टक्के वाढ केली जाणार असून, ती 1 जूनपासून लागू होणार आहे. जर का ही 20 ते 25 टक्के दरवाढ लागू करण्यात आली तर जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. मालवाहतूकदार असोत की व्यापारी, ते स्वत:च्या खिशाला कधीही भुर्दंड पडू देणार नाहीत. त्यामुळे मालवातुकीची झालेली दरवाढ व्यापारी सर्वसामान्यांच्या खिशातून वसूल करणार. यामुळे महागाई येत्या काही दिवसांत प्रचंड वाढणार हे सत्य आहे.

दुसरीकडे आर्थिक घोटाळ्यांमुळे बँकिंग क्षेत्रातही कमालीची अस्वस्थता आहे. नीरव मोदीसारखे घोटाळेबाज परदेशात पळून गेले आहेत. मात्र, बँकांनी ही लुटमार भरून काढण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांना लुटण्यास सुरुवात केली आहे. कालपर्यंत निःशुल्क असणार्‍या सेवा या बँकांनी सशुल्क करून ग्राहकांची लूट सुरू केली आहे. हा मनमानी कारभार रिझर्व्ह बँकेच्या समक्ष सुरू असताना कुणीही बँकांना तंबी देत नाहीत. अशाप्रकारे देशातील प्रत्येक घटक अस्वस्थ आहे. शेतकरी, तरुण, नोकरदार प्रत्येकाला जगताना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर उतरून आपल्यावरील अन्यायाला शेतकर्‍यांना वाचा फोडावी लागत आहे, हे चित्र भारतासारख्या प्रगत देशाला मुळीच शोभनीय नाही. आता सर्वात मोठे संकट समोर उभे ठाकणार आहे ते म्हणजे महागाईचे. त्याचा सामना या देशातील जनता कसे करते हे महत्त्वाचे ठरेल.