जेव्हा विकृतीची हद्द संपते…!

0

जळगाव जिल्ह्यात काल एका परिवाराची निर्घृण हत्या करण्यात आली. यामध्ये नवराबायकोसोबत दोन निष्पाप निरागस बालकांचा समावेश होता. त्यात मुलगी 4 वर्षांची आणि मुलगा 6 वर्षांचा. या घटनेने जळगावसहित अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. हत्येची कारणं स्पष्ट नाहीत अजून. मात्र, पैसा हे कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा घटना ऐकल्यानंतर मानवी प्रकृती आणि मानवी स्वभावावरचा विश्‍वासच उडायला होतोय. या घटनांचा करावा तेवढा धिक्कार कमीच आहे. वादातून खुनाच्या घटना आजकाल साधारण गोष्ट झालीय जणू. मात्र, यामध्ये हळहळ वाटतेय ती त्या लहान लेकरांची. ही घटना सध्या तपासाच्या कक्षेत आहे. आरोपींचा शोध घेतला जातो आहे. तूर्तास आपण निष्पापांच्या बळी घेणार्‍यांचा निषेध आणि त्यांना कडक शासन व्हावे एवढीच अपेक्षा बाळगू शकतो.

ही घटना डोक्यात घोळत ठेवूनच काल बाजारात फिरत असताना लहान लेकरांच्या संवेदनांशी खेळणारी एक भयानक विकृती नजरेस पडली. आपण किती संवेदनशून्य जगात राहतोय याची अशा गोष्टी पाहिल्यानंतर प्रचिती येतेय. पैशांसाठी माणूस किती विकृत झालाय हे आजकाल सांगण्याची गोष्ट राहिलेली नाहीच. जळगावात काल ही घटना घडल्यावर आम्ही मार्केटमध्ये गेलो असता रस्त्यावर भीक मागणार्‍या लहान मुलींचा एक ग्रुप भेटला. चित्रात दाखवल्याप्रमाणे हाताला डुप्लिकेट बँडेज लावून ही पोरं संपूर्ण बाजार छानून काढतात. हातात बँडेज लावून त्यांचा हात वाकडा बांधलेला असतो किंवा हात मोडून गळ्यात बांधलेला असतो, डोक्याला बँडेज पट्टी बांधलेली असते. एक लहान मुलगी सात-आठ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन भीक मागत असते. अर्थात यापेक्षाही भयानक प्रकार आपल्या निर्दयी समाजात असू शकतात. त्या निरागस मुली माझ्याकडं आल्यावर मी तिला पाहिलं आणि दोघींच्या हाताला सारखं बँडेज पाहून मी तिला काय लागलंय? असं विचारलं. आपण दवाखान्यात जाऊ असं म्हटलं तर त्यांनी नकारार्थी मान हलवून पैशांची मागणी केली. मी मोबाइल खिशातून काढून त्यांचा फोटो घेत आहे असं लक्षात येताच त्या दोघी पळत सुटल्या. मी थोडा मागे गेलो तर त्यांनी तिथून पोबारा केला.

प्रत्येक शहरातील चौकाचौकांत अशी लेकरं दिसतात. ही पोरं नशा करतात यासारखे आरोप लावून आपण बर्‍याचदा धुत्कारतो. मात्र, नशा करण्याची समज तरी या मुलांकडे असते का? हा प्रश्‍न चिंतनीय आहे. वेड्यावाकड्या अवतारात उन्हातान्हात येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक माणसाजवळ ’भूख लागलीय’ या एका ओळीचा आधार घेऊन पैसे मागताना या लेकरांना पैसे कशासाठी लागतात? पैशांचा नेमका वापर काय? मूलभूत गरजा नेमक्या आहेत तरी काय? यांसारख्या अनेक प्रश्‍नांची जाणदेखील नसावी. कोवळ्या निरागस मनावर आघात करून या लेकरांना या पेशात ओढणारी एक जमात इथं कार्यरत असावी कदाचित. असावी काय असेलच! या लेकरांना हे सगळं शिकवलेलं असतं. भीक मागून पैसा कमावण्याचे हे रॅकेटच चालत आहे. या लेकरांना ऑपरेट करणारी एक टीम यांच्या अवतीभवती असते. ही विकृत जमात अशा निरपराध आणि निरागस बालकांना आपल्या जाळ्यात ओढून असे विकृत धंदे करायला लावते. यामध्ये लहान मुलींसोबत लैंगिक छळाचीदेखील प्रकरणे समोर येत राहतात. या मुलांकडे पाहिल्यानंतर यांच्याकडून फक्त भीक मागून पैसे कमावणे, हा एकमात्र उद्देश असावा असं अनेकदा वाटत राहतं. ही विकृत काम करणारी जमात भयानक आहे. समाजातील काही संघटना अशा मुलांसाठी काम करतदेखील आहेत. या मुलांना मुख्यधारेत आणण्यासाठी या सामाजिक संस्थांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत, हे या उदाहरणांवरून स्पष्ट होतेय. यासाठी प्रशासन आणि शासनाने काही कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. एखादा व्यक्ती म्हणून या मुलांशी संवाद करणे खरोखर कठीण आहे. कारण यांच्याशी संवाद साधल्यास त्यांच्या किंवा संवाद साधणार्‍यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा घटनादेखील समोर आल्या आहेत. ही मुलं कुठून येतात? कुठे जातात? नेमकं काय करतात? यांना ऑपरेट करणारे कोण आहेत? माणूस म्हणून जगायला भेटतंय का? या रॅकेटच्या पाठीमागे नेमकं काय शिजतंय? हे सगळे प्रश्‍न तूर्तास अनुत्तरित आहेत. जर या मुलांना या धंद्यांसाठी नशा वगैरेची आमिषे दाखवली जात असतील तर सामाजिक संघटनांनी किंवा प्रशासनाकडून यांच्या कौन्सिलिंगची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.

आपल्या एक-दोन रुपये देण्याने या निरागस लेकरांचे प्रश्‍न सुटणार नाहीयेत हे चांगलं माहीत आहे आणि लिहिण्यानेदेखील विशेष काही फरक पडला तर नशीब. कालपासून ’त्या’दोन लेकरांचे चेहरे आणि त्यांचे कृत्रिम जखमेने सजवलेले शरीर डोळ्यासमोरून जात नाहीयेत. व्यवस्थेकडून अर्थात प्रशासनाकडून अपेक्षा आहेत की यावर धोरणात्मकदृष्ट्या काम व्हावं. सामाजिक संघटनांनीदेखील थोडंसं गंभीरपणे या विकृतीकडे पाहणे आवश्यक आहे. विकृती ही भयानक असते. तिला कुठला रंग नसतो, धर्म नसतो. डुप्लिकेट जखमा घेऊन ’36 डिग्री’त फिरणार्‍या या लेकरांच्या निरागस डोळ्यात त्यांना हे कृत्य करायला भाग पाडणार्‍या लोकांच्या विकृतीची हद्द संपते की नाही? हादेखील सवाल आहे.

एखादा व्यक्ती म्हणून या मुलांशी संवाद करणे खरोखर कठीण आहे. कारण यांच्याशी संवाद साधल्यास त्यांच्या किंवा संवाद साधणार्‍यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. अशा घटनादेखील समोर आल्या आहेत. ही मुलं कुठून येतात? कुठे जातात? नेमकं काय करतात? यांना ऑपरेट करणारे कोण आहेत? माणूस म्हणून जगायला भेटतंय का? या रॅकेटच्या पाठीमागे नेमकं काय शिजतंय? हे सगळे प्रश्‍न तूर्तास अनुत्तरित आहेत. जर या मुलांना या धंद्यांसाठी नशा वगैरेची आमिषे दाखवली जात असतील तर सामाजिक संघटनांनी किंवा प्रशासनाकडून यांच्या कौन्सिलिंगची मोठ्या प्रमाणावर गरज आहे.

निलेश झालटे – 9822721292