जेसनवर एका कसोटीसाठी सामन्यासाठी निलंबन

0

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या कारवाईमुळे वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत खेळू शकणार नाही. विंडीजने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत षटकांची गती संथ राखल्याबद्दल, त्यांच्या कर्णधारावर आयसीसीने एका कसोटी सामन्यासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. आयसीसीच्या नियमावलीनुसार, एखाद्या संघाने बारा महिन्यांच्या कालावधीत षटकांची गती संथ राखण्याचा गुन्हा केला तर त्या संघाच्या कर्णधारावर दुहेरी कारवाई करण्यात येते. त्यानुसार जेसन होल्डरला मानधनाच्या साठ टक्के रकमेचा दंड आणि एका कसोटीतून निलंबन अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात संथ गतीने गोलंदाजी केल्यामुळे विंडीजच्या इतरही खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला होता.

विंडीजच्या खेळाडूंना त्यांच्या मानधनापैकी 30 टक्के रक्कम दंड म्हणून ठोठावण्यात आली. तो सामना न्यूझीलंडने एक डाव आणि 67 धावांनी जिंकला होता. जमैकात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतही विंडीजने संथ गतीने गोलंदाजी केल्याचे आढळून आले होते. बारा महिन्याच्या आतच ही दुसरी घटना आहे. बंदी घातल्यामुळे जेसन होल्डरला आता हेमिल्टन कसोटीत खेळता येणार नाही.