जेसीबीद्वारे तोडल्या हातगाड्या

0

जळगाव । सोमवारी झालेल्या बैठकीनुसार आज सकाळ 9.30 वाजेपासून अतिक्रमण निर्मुलन मोहिम पोलीस बंदोबस्तात सुरूवात करण्यात आली. बळीराम पेठेत अप्पर आयुक्त राजेश कानडे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे आदी उपस्थित होते. या अतिक्रमण निर्मुलनांसाठी पाणी पुरवठा, बांधकाम विभाग, अतिक्रमण निर्मुलन विभागातील जवळपास 300 कर्मचार्‍यांसह याविभागातील इंजिनिअर सकाळी 9 वाजेपासूनच महापालिकेसमोर जमले होते. आज जेसीबीच्या सहाय्याने दुकानांसामोरील ओटे, रॅम्प काढून टाकण्यात आले. तसेच याकारवाईत हॉकर्संच्या असंख्य हातगाड्या, टपर्‍या जेसीबीच्या सहाय्याने चेपविण्यात आल्या. याप्रसंगी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक, पोलिस उपनिरिक्षक व 5 पुरुष व 1 महिला कर्मचारी तसेच 8 टॅक्टर , 1 ट्रक व 1 जेसिबी असा फौजफाटा होता. प्रभारी अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी सूचना दिल्यानतंर चार पथके तयार करण्यात आली.

लपवलेल्या हातगाड्यांवर सक्रांत
ही चारही पथके बळीरामपेठ परिसरातील सानेगुरुजी चौकात आलीत. तेथून सर्वांना रस्ते वाटून देण्यात आलेत. त्यानतंर बळीराम पेठेतील दुर्गा देवी मंदिर गल्लीतून अतिक्रण काढण्यास सुरुवात करण्यात आली. बळीरामपेठमधील प्रकाश मेडीकल गल्ली, भवानी मंदिर, हरेंब गणेश मंदिर समोरील विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. तर धरणगाव गल्लीत खुल्या प्लॉटवर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी लपवून ठेवलेल्या लोटगाड्या, लोखंडी पेट्या या जप्त करून त्या जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले. यात रस्त्यांवर लावण्यात आलेले फलक जेसिबीने तोडून ते हस्तगत करण्यात आले. यानतंर धरणगाव गल्लीत असलेल्या खुल्या भुखंडावर हॉकर्सनी लावलेल्या सुमारे 20 ते 25 हातगाड्या व 5 लोखंडी पेट्या जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई सुरू असतांना हॉकर्स व महापालिका कर्मचारी यांच्यात वाद झाला. यावादाला पथकाने न जुमानता या हातगाड्या रस्त्यांवर काढून त्या जेसिबीच्या साह्याने तोडून टाकत त्या हस्तगत केल्या.

दाणाबाजारातील रॅम्प, ओटे काढले
रस्त्यावर लावलेल्या हातागाड्या तसेच टपर्‍या तश्याच्या तश्या जप्त न करता त्या रस्त्यावर टाकून जेसिबीने तोडून टाकण्यात येत होत्या व त्यानतंर त्या जप्त करण्यात येत होत्या. यामुळे रस्त्यावर गर्दी झाली होती. तसेच टपर्‍या तोडण्यास हॉकर्सकडून विरोध करण्यात येत असल्याने बाचाबाची होवून काही तणाव निर्माण झाला होता. दाणाबाजारात दिवसभर अवजड वाहने उभी असतात. तसेच त्यांची वाहतूक सुरू असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. अवजड वाहनांमुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी सकाळी, दुपारी असा टाइम झोन आखण्यात आला आहे. लवकरच हा टाइम झोन लागू करण्यात येणार आहे. मात्र, आज पथक दाणाबाजारात गेल्यावर या ठिकाणी असलेल्या दुकानांचे बाहेर आलेले रॅम्प व ओटे तोडण्यात आले.

…तर डोके फोडून घेण्याची धमकी
दरम्यान, मोकळ्या जागेच्या बाजूला एक लोखंडी टपरी होती. अतिक्रमण पथकाने ही टपरी उचलण्याचा करण्याचा प्रयत्न करताच भाजीपाला विक्रेत्या संघटनेच्या शकुंतला भरत पाटील या टपरीजवळ आल्यात. तसेच टपरी मी घेवून जाते सांगत पथकाला विरोध केला. त्यांनी याबाबत अप्पर आयुक्त कानडे यांना सांगीतले असता, त्यांनी टपरी जप्त करण्याच्या सूचना पथकाला केल्या. यावर शकुंतला पाटील यांनी टपरीला हात लावला तर डोके फोडून घेण्याची धमक दिली यावेळी दिली. टपरी व जेसिबीच्यामध्ये येवून त्या थांबल्यात. त्यांनी टपरीतील भाजीपाला काढून घेतला. यानतंर महिला पोलिस व पथकातील महिलांनी त्यांना बाजूला घेतल्यानंतर जेसीबीच्या साह्याने टपरी तोडण्यात यवून जप्त करण्यात आली. या घटनेमुळे या ठिकाणी जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.

तळघरातील गोडावून केले सील
दरम्यान, बळीरामपेठमधील भवानी मंदिराच्या समोरील गल्लीत नवीन तयार केले जात असलेल्या गल्लीत अप्पर आयुक्त कानडे, नगरसेवक सुनील माळी, नगररचना विभागाचे अभियंता इस्माईल शेख हे इमारतींची पाहणी करत होते. एका बांधकाम पूर्णत्वास आलेल्या इमारतीच्या तळघराकडे लक्ष गेले. ईमारत मालकास पार्किंगसाठी जागा कुठे आहे विचारणा केल्यावर मालक गोंधळून गेले. तळघरात पार्किंगसाठी जागा केली आहे असे सांगितले. यावर आयुक्तांनी मला पार्किंग बघ्याची असून शटर उघडण्यास सांगितले. शटर उघडताच पार्किंगसाठी जागा नसून ती गोडावून म्हणून अढळल्याने अप्पर आयुक्तांनी तळघर सिल करा, नंतर पंचनामा करा असे आदेश दिले.

इमारतीच्या तळघरांचे सर्वेक्षणाच्या सूचना
अतिक्रमण कारवाई दरम्यान अप्पर आयुक्तांना इमारतीच्या तळघरात गोडावून आढळले. तसेच मोठ्या प्रमाणात शहरात इमारतीच्या तळघार पार्किंग दाखवून त्याचा व्यवसायिक वापर केला जात असल्याची माहिती मिळाली. याबाबत त्यांनी नगररचनाचे अभियंता शेख यांना त्वरीत सर्व इमारतींचे तळघरांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. अतिरिक्त दहा कर्मचारी देतो पण तातडीने हे काम सुरू करा असे सूचन्या दिल्या. दरम्रान इमारत मालक श्री. देवकर यांना सर्व कागदपत्र घेवून मनपात मला भेटा असे सांगितले.