उल्हासनगर : रहदारीच्या रस्त्यावर खोदकाम करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने बीएसएनएलच्या केबल वायरीसह पाण्याच्या जलवाहीन्या फोडण्याच्या घटना उल्हासनगर शहरात सतत घडत असतात. रविवारी सकाळी चोकप झालेल्या जलवाहीनीचे काम करण्याकरीता जेसीबी मशीनने रस्ता खणताना महानगर गॅसची पाईपलाईन फुटली. त्यातून मोठयाप्रमाणात गॅस बाहेर आल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन काही जणांचा श्वास गुदमरू लागला. सुदैवाने त्याच वेळी मुसळधार पाऊस आल्याने गॅसची तिव्रता कमी झाली. महानगर गॅसच्या व अग्निशनम दलाच्या कर्मचा-यांनी त्याठिकाणी वेळीच धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनूसार शहरातील कॅम्प नं. ५ येथील गुरूनानक शाळेजवळील स्वामी शांतीप्रकाश हॉल येथील विनोद ठाकूर यांच्या आॅफीससमोरील रोडवर जलवाहीनीची लाईन चोकप झाली होती. रविवारी सकाळी जलवाहीनीचे चोकप शोधण्यासाठी जेसीबी मशीनद्वारे त्याठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू करण्यात आले होते. सकाळी साडे ११ च्या सुमारास खोदकाम करताना जेसीबी मशीनचा जलवाहीनीच्या लगत असणा-या महानगर गॅसच्या पाईपला धक्का लागल्याने ती पाईपलाईन फुटून मोठा स्फोट झाला. त्याठिकाणाहून मोठयाप्रमाणात गॅस गळती होऊ लागल्याने त्या परिसरात धुराचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरीक व परिसरातील रहिवाश्यांना या गॅसचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी घराबाहेर धुम ठोकली. मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता त्याठिकाणी निर्माण झाल्याने या घटनेबाबत पोलिस नियंत्रण कक्ष विठ्ठलवाडी पोलिस ठाणे अग्निशमन दल याठिकाणी नागरीकांनी फोन केले. त्याचदरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाल्याने गॅसची तिव्रता कमी झाली.
याशिवाय ज्याठिकाणाहून गॅस बाहेर येत होते त्याठिकाणी जेसीबी चालकाने मशीनचे लोखंडी साहित्य त्यावर ठेवले. महानगर गॅसच्या कर्मचा-यांनी त्वरीत त्याठिकाणी धाव घेऊन गॅसचे वॉल बंद केले. त्यामुळे गॅसची गळती थांबली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे व.पो.नि.सुरेंद्र शिरसाट, प्रभाग समिती ४ चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी त्याठिकाणी येऊन पाहणी केली. त्याठिकाणावरील रहदारीचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. महानगर गॅसच्या कर्मचा-यांनी त्वरीत दुरूस्थीचे काम हाती घेतले. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच मुसळधार पडला नसता तर मोठी जिवीतहानी झाली असती पण तो प्रसंग टळला. रस्त्यावरील खोदकाम करताना कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने असे प्रकार शहरात सातत्याने घडत आहेत. यावर पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.