शिंदखेडा । तालुक्यातील आच्छी येथील तापी नदीच्या पात्रात रेतीचा घाटाच्या ठिकाणाहून दिवस रात्र वाळूचे अमाप व बेकायदा उत्खनन होत आहे. वाळूवाहक वाहने पाच मिनिटात कशी भरली जातात, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करुन जेसीबी, पोकलेन, बोटीच्या साह्याने रेतीचे उत्खनन केले जात आहे, याकडे महसूल यंत्रणा सर्रास दुर्लक्ष करीत आहे, असा सूज्ञ जनता आणि पर्यावरण प्रेमींचा आक्षेप आहे.
माहिती देवूनही कार्यवाही नाही
काल मध्यरात्री शिंदखेडा शहरातील नागरिकांनी 3 डंपर वाहतूक करतांना पकडले, तहसिलदारांना याबाबत माहिती देऊन देखील काहीच कार्यवाही केली नाही आणि आपला भ्रमणध्वनी बंद करुन ठेवला. त्यांनी ना कोणत्याच भरारी पथकाला पाठवले. अशीच वाळू वाहतूक होत राहिली तर पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असून याला जबाबदार कोण?. याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
3 वाहने पोलीस ठाण्यात जमा
काल रात्री अशी 3 वाहने पकडण्यात आली, पण कुठलेच महसूल अधिकारी व भरारी पथक न आल्याने शेवटी हे डंपर शिंदखेडा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहेत. त्यात 2 डंपर (एम.एच. 15. एफ.व्ही. 9797), (एम.एच. 18. ए.ए. 8390), तर 12 चाकी ट्रक (एम.एच. 18. एपी. 9009) हे वाहन जमा आहे. वाहनांवर कायदेशिर कार्यवाही करण्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनने तहसिलदार शिंदखेडा यांना पत्र दिले आहे. आज सुटी असल्याने तहसिलदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याबाबत महसूल यंत्रणा काय कार्यवाही करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे. ठोस कार्यवाही होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, बेकायदा वाळू वाहतूक थांबवण्याचे धारिष्ट्य दाखवावे, अशी मागणी होत आहे.