जे.एम. रोडवर टोळक्याचा धुडगूस

0

पुणे । गाडी पार्क करीत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागल्याने संतप्त झालेल्या काही तरुणांच्या टोळक्याने संबंधित तरुणाला जबर मारहाण करीत या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांची नासधूस केली. ही घटना शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास जंगली महाराज मंदिरासमोर घडली. दीक्षित असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो पोलिस कर्मचार्‍याचा मुलगा असल्याचे समजते.

दीक्षित दुचाकी उभी करीत असताना त्याच्या गाडीचा धक्का एका ज्येष्ठ नागरिकाला बसला. त्याने ज्येष्ठ नागरिकांची माफी मागितली. मात्र तेथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी दीक्षित याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत दीक्षित जबर जखमी झाला. त्यानंतर या टोळक्याने परिसरात दहशत माजवून येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांकडे आपला मोर्चा वळवीत या गाड्यांची नासधूस केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. याप्रकरणी दीक्षितने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.