अलिबाग । काम कराल ते प्रामाणिकपणाने करा असा सल्ला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी अभियंत्याना दिला आहे. अभियंत्यांनी आत्मपरीक्षण करुन दिवसभरात काय करावं आणि काय केलं याचा विचार करावा असेही तटकरे यांनी सुचविले आहे. रायगड जिल्हा परीषदेतील बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत आदर्श अभियंता पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिती तटकरे होत्या. या कार्यक्रमाचे पालकत्व जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील यांनी स्वीकारले होते.
सेवानिवृत्त अभियंत्यांचा सत्कार
अभियंता वर्गाने नवनवीन तंत्रज्ञानाची माहीती आत्मसात करीत विकासाची पावले उचलने गरजेचे आहे. या अभियंत्यांनी विचारांची देवाण-घेवाण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपले होणारे नुकसान निदर्शनास येते, त्यामुळे संवाद महत्वाचा असतो हे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परीषदेतील बांधकाम व ग्रामिण पाणी पुरवठा विभागामार्फत आयोजित केलेल्या आदर्श अभियंता पुरस्काराचे मानकरी बांधकाम विभागातील प्रभारी उपअभियंता सदानंद शिर्के, ग्रामिण पाणी पुरवठ्याचे कनिष्ठ अभियंता दिनेश पेडणेकर तर ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता आर. जी. कांबळे यांच्यासह सेवा निवृत्त झालेल्या 9 अभियंत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.