मुंबई : सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेज म्हणजे विविध कलांचा संगमच! विद्यार्थांनी घडवलेल्या कलाकृती वार्षिक कला मेळा प्रदर्शनाच्या माध्यमातून कलाप्रेमींसमोर सादर केल्या जातात. त्या कलाकृती पाहून रसिकांकडून दाद मिळते. पण प्रदर्शन संपल्यानंतर अवघ्या महिनाभरात या कलाकृती धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे कला रसिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या कलाकृतीचे जतन करण्यात यावे अशी मागणी कला रसिकांमध्ये होत आहे.
वर्षभर आपल्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांनी घडवलेल्या कलाकृती कलामेळाच्या माध्यमातून कलाप्रेमींसमोर सादर केल्या जातात. गेल्या महिन्यात हा कला मेळा पार पडला. विविध रंग माध्यमातील चित्र, शिल्प, हस्तकला, अंतर्गत सजावट, धातूकाम, लाकूडकाम आदींचा अविष्कार प्रदर्शनात पाहावयास मिळाला. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट कॉलेजमध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी कलाकारांची नेहमीच झुंबड उडते. कलात्मक आणि सुंदर कलाकृती पाहून कला रसिकांकडून कलाकारांना दाद मिळाली. अनेक कलाकारांच्या कलाकृतीचे कौतुक झाले तर अनेकांना पुरस्कार ही मिळाले. मात्र प्रदर्शनात वाहवा मिळवलेली हीच कलाकृती प्रदर्शनानंतर एका कोपर्यात धूळ खात पडली आहे. कलाकारांनी मेहनतीने बनवलेल्या या कलाकृती एका कोनाड्यात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कलाकृती तुटलेल्या अवस्थेत पडल्या आहेत. या कलाकृतींची अवस्था पाहून अनेक कलारसिकांचे मन खिन्न होत आहे, अशी नाराजी अनेक कलारसिकांनी व्यक्त केली.
अहोरात्र कष्ट करून कलाकार आपली कलाकृती बनवत असतो. त्यामुळे ही कलाकृती धूळ खात पडण्यापेक्षा, सर जेजे आर्ट्समध्ये या शिल्पांचे आणि कलेचे जतन केले गेले पाहिजे. जेणेकरून कलाकाराच्या कलेचे मोल राहील.
शिवाजी चौगुले, कला रसिक