जे.सी.बी.ची मोटरसायकलला धडक : एक जागीच ठार

0

एरंडोल जवळ अपघात ; जेसिबी चालक पसार

एरंडोल:- भरधाव वेगाने जाणा-या जे.सी.बी.ने समोरून येणा-या मोटर सायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटर सायकल चालक जागीच ठार झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री सात वाजेच्या सुमारास भालगाव फाट्याजवळ असलेल्या डीझेल पंपाजवळ झाला. रात्री सात वाजेच्या सुमारास मोटार सायकल ( क्रमांक एम.एच.१८ ए.एक्स १३२१) ने बाबुलाल नरसिंग पवार (वय ५४) हे शेवगे तांडा (ता.पारोळा) येथे जात होते.

भालगाव फाट्याजवळ असलेल्या डीझेल पंपाजवळ समोरून येत असलेल्या जे.सी.बी.(क्रमांक एम.एच.१९ बी.जी.६६८१) ने अचानक वळण घेतल्यामुळे त्याचा धक्का मोटार सायकलला लागला व त्यामुळे जे.सी.बी.च्या पुढील भागात असलेले अणकुचीदार सुपडे मोटरसायकल चालक बाबुलाल पवार यांच्या पोटात घुसल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यु झाला. मयत बाबुलाल पवार हे कु-हाडदे येथे आपल्या नातेवाईकाकडे मानताच्या (धार्मिक कार्यक्रम) गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या मूळ गावी जात असतांना रस्त्यावरच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मयत बाबुलाल पवार यांचे पश्चात पत्नी ,दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. अपघातानंतर जे.सी.बी.चालक फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहे. याबाबत भालचंद्र नरसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जे.सी.बी.चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन उप निरीक्षक एम.एस.बैसाणे तपास करीत आहे.