जे सुरु केले ते बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका; मुख्यमंत्र्यांचा इशारा

0

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून लॉकडाऊन होते मात्र जुलैनंतर अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली. अनलॉकच्या माध्यमातून राज्यात बंद असलेल्या अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या. अजूनही अनेक गोष्टी सुरु व्हायच्या आहेत. दरम्यान काल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत सर्व सुरु करण्यात येईल असे सांगितले होते. दरम्यान आज रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी काळात दिवाळी, दशरा आहेत त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्या, जे सुरु केले आहे ते पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका असा इशारा वजा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पुन्हा लॉकडाऊन करावा लागणार नाही. याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्या प्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं तसं यापुढेही करायचे आहे असे त्यांनी सांगितले.

मुंबई लोकल पुन्हा कधी सुरू होणार? हा प्रश्न सध्या सातत्याने सर्व स्तरातून विचारला जात आहे. यावरही त्यांनी भाष्य केले. कोरोनामुळे गर्दी नको आहे. सध्या लोकल कमी प्रवासी क्षमतेत सुरु आहे, पण इतक्यात तरी मुंबई लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आता नवरात्री येत आहे, त्यानंतर दिवाळी आहे. खूप काळजीपूर्वक एक-एक पाऊल टाकावे लागणार आहे. उघडलेल्या दरवाजातून सुबत्ता, समृद्धी आली पाहिजे, करोना नको, तरच त्या उघडलेल्या दरवाजाला अर्थ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.