जैताणे । साक्री तालुक्यातील जैताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असुविधांचे माहेरघर बनले आहे. सर्वच प्रकारच्या समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर हा काटेरी झुडपांनी वेढलेला आहे. यात साप, विंचू या सारखे विषारी प्राणी असण्याची शक्यता वाढीस लागली आहे. रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना यापासून धोका उत्पन्न होऊ शकत असल्याने हा परिसर स्वच्छ करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. शस्त्रक्रीया गृहाची दयनीय अवस्था – या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजनाच्या होत असतात. जैताणे, निजामपूर जवळील सर्व खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणावर महिला येथे शस्त्रक्रीयेयसाठी येत असतात. मात्र, शस्त्रक्रीया गृहाचा काही भाग कोसळल्याने गेल्या 11 महिन्यांपासून येथे शस्त्रक्रीया करणे बंद आहे.
केसपेपरच शिल्लक नाही
आमच्या प्रतिनिधीने प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता रूग्णांना औषधे ही साध्या कागदावर लिहून दिली जात होती. याबाबत अधिक विचारणा केली असता केस पेपर शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. तर भटू बळीराम जाधव या रूग्णास लिहून दिलेल्या पाच औषधांपैकी तीन औषधे रूग्णालयात शिल्लक नसल्याचे निदर्शनास आले.
जन आंदोलनाचा इशारा
महिन्याभरापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. गंगाथरन यांनी अचानक भेट देवून सर्वंच कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी केली होती. तरीही कर्मचार्यांच्या वर्तुणूकीत बदल झाला नसून तसेच सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. गावकार्यांना सोयी सुविधा न मिळाल्यास जन आंदोलन छेडाण्याचा इशारा दिला आहे. रूग्णांना अस्वच्छतेत रहावे लागत आहे.
नागरिकांकडून तक्रारींचा पाढा
रूग्णालयात शौचालयांचा अभाव – रूग्ण व कर्मचार्यांसाठी येथे शौचालयच उपलब्ध नाहीत. यात महिला रूग्ण व कर्मचार्यांची तसेच
रूग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतांना दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आहे ती देखील अस्वच्छ व शेवटच्या घटका मोजत आहे. जेथे अस्वच्छता असणे गरजेचे आहे अशा संस्थेत ही आरोग्याची अशाप्रकारे हेळसांड होत असेल तर गावातील नागरिकांच्या आरोग्याकडे कोण लक्ष देईल असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सीईओंनी कर्मचार्यांची कानउघाडणी करूनही कामात सुधारणा झालेली नाही.