जैताणेे । अस्वच्छता, अनियमितता, असुविधा आणि प्राथमिक आरोगय केंद्र ह्या चहू गोष्टींचे जणू समीकरणच झाले होते. पण या समीकरणाला फाटा देत जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर, स्वच्छ व चकाचक करण्यात आला. या आरोग्य केंद्राविषयी सर्वच रूग्ण व गावातील नागरीक अनेक समस्या आंदोलनामार्गे मांडत होते. परिणामी सर्व प्रसारमाध्यमांनी आरोग्य केंद्रास टिकेचे लक्ष केले. सर्व बाजुंनी सुरू असलेली टिकेची झोड पाहता स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सोमवारी डॉक्टर उपस्थित नसल्याने गावातील संतप्त तरूणांनी केंद्रास कुलूप ठोकले होते. या आंदोलनाला सामोरे जात आरोग्य अधिकार्यांनी जैताणे येथे भेट देवून समस्या जाणून घेतल्या व योग्य कार्यवाहीचे आवेश दिलेत. त्याचाच एक भाग म्हणून लागलीच आरोग्य केंद्राचा पूर्ण परिसर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने साफ करण्यात आला. काटेरी झुडूपांसह, उकीरडे व गटारी स्वच्छ करण्यात आल्या. या स्वच्छता मोहिमेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यापुढे देखील अशीच स्वच्छ करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.