जैताणे येथे आई भवानी मातेचा नवरात्रोत्सव

0

नवसाला पावणारी जागृत माता; मंदिरासमोर गरबा नृत्याचे आयोजन

जैताणे । साक्री तालुक्यातील जैताणे येथील इतिहासकालीन आई भवानी मातेच्या मंदिरात मांगल्याचे पर्व, नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली असून त्यानिमित्ताने देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. सकाळी देवीची महाआरती व घटपुजन करण्यात आले. जैताणे निजामपूर पंचक्रोशीत भवानी मातेचे फार जुने मंदिर असून या मंदिरात इतिहासकालिन पुरावा देखील आढळतो. नवसाला पावसारी जागृत माता अशी या देवीची अख्यायिका आहे.

तरूणांनी एकत्र येऊन मंदिराचा केला जिर्णोद्धार
मंदिराची दुर्दशा झाल्याने गावातील तरूणांनी एकत्र येत या मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराची शोभा व नावलौकीक वाढवला आहे. मंदिर जिर्णोद्धार समितीतर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवात मंदिराचा परिसर दिव्यांच्या रोषणाईने प्रकाशमय केला जातो. तसेच बालगोपाळांसाठी गरबा नृत्याचे आयोजन करण्यात येते. गुरूवारी पहिल्या माळेला भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी जमली होती. नवरात्राच्या नऊ दिवसात नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यास विशेष महत्व असते म्हणूनच देवीला दररोज वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून विविध प्रकारच्या आभुषणांनी मातेची मुर्ती सजवण्यात आली आहे.