मुंबई : जैतापूर प्रकल्पाचे काम येत्या वर्षापासून सुरू करण्यात येणार असून 2025 सालापर्यंत त्याचा पहिला टप्पा कार्यान्वित होईल, अशी ग्वाही फ्रान्सचे विदेश सचिव ख्रिश्चन मॅसे यांनी मंगळवारी दिली. जपानमधील न्यूक्लिअर पॉवर प्रकल्पात घडलेल्या दुर्घटनेचा अभ्यास करून जैतापूर प्रकल्पात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा बसविण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मॅसे यांच्या नेतृत्त्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा, या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात १० हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. मेक इन महाराष्ट्राच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार असून यासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या उत्पादनाचे ६० टक्के काम येथेच होणार आहे. त्यामुळे प्रकल्पात स्थानिक उद्योगांना सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येईल. स्थानिक कंपन्यांनाही या प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे दर परवडणारे असतील, असेही मॅसे यांनी सांगितले.
कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
त्याआधी मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, असे आवाहन केले. प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भातही जनजागृती करावी. या प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, असेही ते म्हणाले. या प्रकल्पासंदर्भात लोकांमध्ये अनेक प्रश्न आहेत. ते दूर करण्यासाठी स्थानिकांशी सुसंवाद साधण्यात यावा. प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात काय उपाययोजना राबविणार आहात, याची माहिती द्यावी. याशिवाय या प्रकल्पातून निर्मिती होणाऱ्या विजेच्या दराबाबतही स्पष्टता असावी, असेही ते म्हणाले.