जैद अहमद अजिंक्य

0

ठाणे । बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कॅरम स्पर्धा जैद अहमदने जिंकली. अंतिम फेरीत जैदने सलाउद्दीन शेखचा 25-10, 25-0 असा पराभव करत रोख पाच हजार रुपयांच्या पुरस्कारासह अजिंक्यपदाचा चषक पटकावला.

बदलापूर येथील यशस्विनी सभागृहामधील कॅरम स्पर्धेत ब्रेक टू फिनिशची नोंद करणार्‍या जैद अहमदने अंतिम फेरीमध्ये सुरुवातीपासूनच आकर्षक फटक्यांचा अचूक खेळ केला. दोन्ही गेममध्ये सरळ वर्चस्व राखल्यामुळे त्याने सलाउद्दीन शेखवर सतत दडपण निर्माण केले. परिणामी शेखला सलग दोन गेममध्ये हार पत्करावी लागली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सलाउद्दीन शेखने विशाल शिरसाटवर 25-10, 25-7 असा तर जैद अहमदने विनायक जाधववर 25-6, 25-4 असा विजय मिळविला.

यावेळी कॅरमपटू महेंद्र तांबे व राष्ट्रीय ख्यातीचे पंच प्रणेश पवार यांनी बदलापूरमधील शालेय मुलांना व उदयोन्मुख खेळाडूंना मोफत सराव प्रशिक्षण व नियमांची माहिती दिली.