जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 1352 सहकार्‍यांचे रक्तदान

0

जळगाव । जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालालजी अर्थात बाबा यांच्या 27 व्या स्मृतिदिनी आयोजित रक्तदान शिबिरात जैन इरिगेशनच्या प्लास्टिक पार्क बांभोरीसह इतर ठिकाणच्या सहकार्‍यांनी उस्फूर्त रक्तदान केले. 1352 इतक्या रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा सामान्य रूग्णालय, केशव स्मृति प्रतिष्ठान संचलित स्व. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी, गोदावरी मेडिकल कॉलेज रक्तपेढी, भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रक्तपेढी, धुळे सिव्हील हॉस्पिटल रक्तपेढी या संस्थांनी रक्ताचे संकलन केले.

देशभरातील अस्थपनांत राबविला उपक्रम
स्व. हिरालालजी जैन यांच्या स्मृतिंना अभिवादन व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी जैन इरिगेशनच्या सहकार्‍यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प घेतला आहे. या रक्तदान शिबिरात जैन प्लास्टिक पार्क येथे 764, जैन फूडपार्क -316, जैन अग्रीपार्क 85, बडोदा – 36, चित्तूर – 28, उदमलपेठ – 23, हैदराबाद – 35, भावनगर – 40 आणि अलवर येथे 25 सहकार्‍यांनी उस्फूर्त रक्तदान केले. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन तसेच महाराष्ट्र विपणन प्रमुख अभय जैन यांनी देखील रक्तदान करून आपल्या आजोबांना आदरांजली अर्पण केली.

गोर गरिबांसाठी अन्न छत्र
यावेळी दलुभाऊ जैन यांनी मंगलीक म्हटली. अशोक जैन या सह स्नुषा व जैन परिवारातील सदस्य उपस्थित होते. सुमारे 1600 जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या शिवाय बालक आश्रम, अंध शाळा, हरिजन सेवक संघ मुलींचे वसतीगृह, गायत्री मंदीर, बाबा हरदास संघ आदी ठिकाणी देखील भोजनाचे वाटप करण्यात आले.

गाडेगाबाबा उद्यानात भोजन वाटप
जळगाव येथील संत गाडगे बाबा उद्यानात स्व. बाबांच्या स्मृतिदिनी गोर गरिबांसाठी 11 ते 2 वाजेच्या दरम्यान भोजन देण्यात आले. या ठिकाणी जैन परिवाराच्यावतीने स्व. हिरालालजी जैन यांच्या पवित्र स्मृतिंना अभिवादन करण्यात आले. कंपनीच्या जळगाव व चित्तूर, हैद्राबाद, उदमलपेठ, अलवर, बडोदा, भावनगर येथील सुरक्षा विभाग, वैद्यकीय विभाग, मानवसंसाधन तसेच पर्सोनेल विभागाच्या सहकार्‍यांनी रक्तदान शिबिरासाठी कामकाज पाहिले.