जळगाव । जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडने त्यांच्या अमेरिकेतील (युएसए) उपकंपनीच्या माध्यमातून दोन मोठ्या सिंचनप्रणित कंपन्यांचे 80 टक्के भागभांडवल खरेदी करून अधिग्रहण केले आहे. अमेरिकेतील ऍग्री व्हॅली इरिगेशन (एव्हीआय) आणि इरिगेशन डिझाईन एण्ड कन्स्ट्रक्शन (आयडीसी) या सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील सर्वात मोठ्या वितरक कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. या दोन्ही कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीनंतर एक स्वतंत्र नवीन वितरण कंपनी जैन इऱिगेशन स्थापन करणार आहे. याद्वारे अमेरिकेतील शेतकर्यांना जैन इरिगेशनच्या अत्याधुनिक उच्चकृषी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक नावीन्यपूर्ण असे उच्चकृषी तंत्रज्ञान, त्याचे आरेखन, सेवा व उभारणी दिली जाईल व यातून त्यांना मोअर क्रॉप पर ड्रॉप ची अनुभूती घेता येईल.
जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी भारतीय शेतकर्यांसमवेत संपूर्ण जगातील कृषी व शेतकर्यांच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेतला होता. 1985 मध्ये त्यांनी अमेरिकेतील फ्रेस्नो या शहरात कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने पहिल्यांदा पाऊल ठेवले. सेवा, गुणवत्ता आणि उच्च तंत्रज्ञानाच्या बळावर आज अमेरिकेत जैन इरिगेशन क्रमांक 1 वर पोहोचली आहे. त्यांनी साध्य केलेल्या जागतिक विस्ताराच्या भक्कम पायावरच आता जैन इरिगेशनला अमेरिकेतील या दोन महत्त्वपूर्ण कंपन्यांचे अधिग्रहण करता येणे शक्य झाले. – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सि. लि.
या धोरणात्मक गुंतवणुक व सहभागातून आमच्या उद्योग क्षेत्राला वेगळी दिशा देता आली याचा आम्हाला आनंद आहे. या अधिग्रहणातून जैन इरिगेशन कंपनीला कृषीकेंद्रीत आखणी आणि एकूणच क्षमतेत वाढ करण्यासही मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. याच बरोबर अत्याधुनिक शेती सिंचन तंत्रज्ञान शेतकर्यांना अधिक विस्तृत आणि अद्ययावत स्वरूपात देता येईल. विलिनीकरणासाठी सहकार्य लाभल्याबद्दल सहकारी यांच्याविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करून त्यांचेही अभिनंदन करतो.- अनिल जैन, व्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सि. लि.
या कराराची मुख्य वैशिष्ट्ये
कॅलिफोर्नियातील या सर्वात मोठया दोन वितरक कंपन्यांच्या एकत्रिकरणातून 13 ठिकाणी असलेली त्यांची वितरण व्यवस्था 225 हून अधिक सहकार्यांच्या माध्यमातून तेथील जैन इरिगेशनचे वितरण होईल सशक्त. जैन इरिगेशनच्या अमेरिकेतील उपकंपनी समवेत आता ही विलीनीकरण झालेली नवी कंपनी मिळून अमेरिकेतील सर्वात मोठी सिंचन कंपनी म्हणून नावारूपास येईल. अधिग्रहीत केलेल्या दोन्ही कंपन्यांचा डिसेंबर 2016 अखेरीस एकत्रित व्यवसाय 113 मिलीयन डॉलर्स म्हणजेच भारतीय मूल्यात होता 735 कोटी रुपये एवढा. जैन इरिगेशनच्या इतर उत्पादन शृंखलेसमवेत आब्झरव्हंट, प्युअरसेन्स, गाविश या आघाडीवर असलेल्या उत्पादनांनाही मिळेल चालना. अधिग्रहीत कंपनीच्या सहकार्यांद्वारे भविष्यातील व्यवसायाला मिळेल चालना.