जैन इरिगेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

0

जळगाव । शरीर, मन आणि बुद्धीच्या आरोग्यासाठी नियमित योग अभ्यास करणे गरजेचे आहे, असा सल्ला योगाभ्यासक श्रीयुत सुभाष जाखेटे यांनी दिला. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी ते कंपनीच्या सहकार्‍यांना योगाभ्यासाचे महत्त्व सांगत होते. कंपनीतील सहकारींनी योग करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेतला होता.

200 सहकारी सहभागी
प्लास्टिक पार्क येथील प्रशासकीय इमारतीसमोरील पटांगणावर कंपनीच्या सहकार्‍यांनी सकाळी 8.00 वाजता प्रार्थना, ओंकार, प्राणायाम, ताडासन, वक्रासन, सुखासन आदी योग प्रकार करून घेतले. श्रीयुत जाखेटे यांचे सहाय्यक योगेश बावणे यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले. प्लास्टिक पार्क येथे झालेल्या सकाळच्या सत्रात सुमारे 1200 सहकारी सहभागी झाले होते. टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क येथील सहकार्‍यांसाठी देखील योग व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथील महिला, पुरुष सहकार्‍यांनी सहभाग घेतला. याच पद्धतीने जैन एनर्जी पार्क येथील सहकार्‍यांकडून दुपारच्यासत्रात योगाभ्यास करून घेतला. यावेळी कंपनीच्या सहकार्‍यांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.

विद्यार्थ्यांना दिली माहिती
अनुभूती स्कूलच्या असेंब्ली हॉलमध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला. यात सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ. गोविंद तिवाडी यांनी आरोग्य आणि योग याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांच्याकडून सहज सोप्या पद्धतीने योग करून घेतला. बडीहांडा सभागृहात कंपनीतील वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी योग आणि निरामय जीवन याबाबत तिवाडी यांनी सोदाहरण माहिती सांगितली. भारतातील 5000 वर्षे जुनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे. ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते याचे महत्त्व लक्षात घेता 21 जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा होत आहे.