जैन इरिगेशनमध्ये प्रवेश करतांना सुपरवायझरला ट्रकने उडविले

0

महामार्गावरील घटना ; पाळधी पोलिसांनी ट्रकचालकासह ट्रकला घेतला ताब्यात

जळगाव- नेहमीप्रमाणे कंपनीत जाण्यासाठी दुचाकीने निघाले, कंपनीजवळ पोहचले, कंपनीत प्रवेश करण्यासाठी वळण घेताच मागून येणार्‍या ट्रकने जैन इरिगेशन कंपनीचे पीव्हीसी पाईप प्रोडक्शन विभागाचे पर्यवेक्षक रविंद्रसिंग फत्तेसिंग वटपाल वय 55 रा. शिवकॉलनी यांना उडविल्याची घटना रविवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास महामार्गावर घडली. अपघातानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. दुपारी 1.12 मिनिटांनी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वटपाल यांच्या डोक्यात हेल्मेट असतांनाही दुर्देवी अपघातात कमेरखाली मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

पत्नी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका
मूळचे वटपाल, साकळी, ता. मलकापूर येथील रहिवासी रविंद्रसिंग वटपाल हे पत्नी छाया यांच्यासोबत शिवकॉलनी येथे वास्तव्यास आहेत. मुलगा सुकेश हा पुण्यात कंपनीत नोकरीला आहे तर मुलगी सायली हिचा विवाह झाला असून ती सुध्दा पुण्यातच सासरी नांदते. छाया ह्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. वटपाल हे 28 वर्षापासून जळगाव-पाळधी रस्त्यावरील जैन इरिगेशन कंपनीत नोकरीला आहेत.

कंपनीच्या कर्मचार्‍यांचे शर्थीचे प्रयत्न ठरले अपयशी
वटपाल हे नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजेच्या सुमारास शिवकॉलनी येथून दुचाकीने (एम.एच. 19 ए.ए.9502) कंपनीत जाण्यासाठी निघाले. कंपनीजवळ पोहचले. महामार्गावरुन कंपनी प्रवेश करण्यासाठी वळण घेणार तोच मागून पाळधीकडे जात असलेल्या तांदळाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातांना कंपनीच्या कर्मचार्‍यांनी तातडीने कंपनीच्याच रुग्णवाहिकेने प्रारंभी नाहटा अ‍ॅक्सीटेंन्ट हॉस्पिटलला हलविले. याठिकाणी डॉक्टर उपलब्ध नसल्याने तेथून सहयोग क्रिटीकल केअर येथे हलविण्यात आले. याठिकाणी दुपारी 1.12 वाजता वटपाल यांची मृत्यूंशी झुंज संपली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

डोक्यात होते हेल्मेट मात्र नशिबाने साथ सोडली
वटपाल हे नियमितप्रमाणे हेल्मेट घालूनच दुचाकीवरुन कंपनीत ये-जा करत होते. रविवारी जात असतांना त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी कर्मचार्‍यांनी दिली. मात्र हेल्मेट असतानाही नशिबाने साथ सोडली. दुर्देवी अपघातात कमरेला दुखापत होवून वटपाल यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह कंपनीच्या कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पत्नी छाया यांनी मन हेलावणारा आक्रोश केला. फोनवरुन वटपाल यांचा मुलगा तसेच मुलीला कळविण्यात आले असून दोघेही जळगावकडे रवाना झाले आहेत.