जळगाव । औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्रात पहिल्यांदाच औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी सर्वाधिक नवीनतम कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.यात नाशिक विभागातील औद्योगिक क्षेत्रात कामगारांसाठी सर्वाधिक नवीनतम कल्याणकारी योजना राबविल्याबद्दल जैन इरिगेशनचा व्दितिय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कामगारांसाठी विविध प्रकारच्या नवीनतम जास्तीतजास्त कल्याणकारी योजना राबविणे हा निकष लावून नाशिक विभागातील लघू, मध्यम आणि मोठ्या गटातील औद्योगिक कंपन्यांच्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
वरिष्ठ अधिकारी सी.एस नाईक यांनी स्वीकारला गौरव
31 मार्च रोजी विभागातील मोठ्या कंपन्यांच्या गटात जैन इरिगेशनसह 12 कंपन्यांचा समावेश होता. परिक्षकांनी याबाबींचा विचार करून नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्सचा प्रथम आणि जैन इरिगेशनचा व्दितिय क्रमांक घोषित केला. निवड झालेल्या कंपन्यांचे राज्यपातळीवर नामांकन देखील करण्यात आले आहे. एक हजारहून जास्त कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपन्यांच्या गटातून मिळालेले हे पारितोषिक कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सी.एस. नाईक यांनी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एम. एस. प्रभावळे व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहाय्यकसंचालक सौ. आढे यांच्याहस्ते स्वीकारले. हा कार्यक्रम नाशिक (अंबड) सहानी इंडस्ट्रीजच्या प्रांगणात 31 मार्च रोजी पार पडला. या सोहळ्यास जैन इरिगेशनचे कामगार कल्याण अधिकारी किशोर बोरसे, रवींद्र कमोद आणि अरूण चौधरी हे प्रतिनिधी उपस्थित होते.