जळगाव । जैन इरिगेशन सिस्टिम्स आणि बेंगळूरू येथील युनिर्व्हसिटी ऑफ ग्रीकल्चर सायन्सेस (युएएसबी) यांच्यात ‘कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार’ या संदर्भातील सहकार्य करार करण्यात आला. या करारावर कंपनीच्यावतीने सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन आणि युएएसबीचे वरिष्ठ निबंधक डॉ. ए. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केली. या करारामुळे कृषी क्षेत्रातील नवीन संशोधनाला वेगळी दिशा मिळणार असुन शेतकर्यांना त्याचा फायदा होणार आहे.
कृषी क्षेत्रात संशोधनाचे नवे दालन खुले, शेतकर्यांना होणार लाभ
जैन हिल्स येथे युएएसबीचे शिष्ट मंडळ आले होते. याप्रसंगी कुलगुरू डॉ. एच. शिवण्णा, डॉ. बी. एच. अशोका, जैन इरिगेशनचे अनिल कटारिया, डॉ. बाळ क्रिष्णा उपस्थीत होते. जैन इरिगेशन व युएएसबी यांच्यात झालेल्या करारानुसार कृषी व कृषी अभियांत्रिकी या विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. माती आणि जलअभियांत्रिकी, हंगामानंतर प्रक्रिया अभियांत्रिकी या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. कृषी क्षेत्रात संशोधन करणारे शास्त्रज्ञ व संशोधक ज्यांची पात्रता सल्लागार म्हणुन असेल ते पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी सह सल्लागार म्हणुन सल्लागार समीतीचे कार्य करतील. या करारामुळे सुधारीत लागवड साहित्य, यंत्रे, नकाशे आणि तंत्रे विकसीत होण्यास मदत होईल. संयुक्तरित्या एखादे संशोधन निघाले तर त्याचे पेटंट संयुक्त नावाने रजिस्टर केले जाणार आहे. हा करार पुढील पाच वर्षासाठी राहणार आहे. या करारांतर्गत युएएसबीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, संशोधन कार्य यासाठी त्यांनी ठरविलेल्या विषयांवर पुरस्कृत केले जाणार आहे.
शोधकांनाही मिळेल नवी संधी
या करारानुसार जैन इरिगेशनव्दारे नियुक्त विद्यार्थी, संशोधक, सहकारी यांना त्यांच्या संशोधनासाठी प्रयोगशाळा, उपकरणे, रसायने, प्रयोगशाळा तज्ज्ञ व ग्रंथालय आदी सुविधा बेंगळूरू विद्यापीठात उपलब्ध केल्या जाणार आहेत. शास्त्रीय प्रकाशने, साहित्य व माहिती यांची देवाण घेवाण करणे. शास्त्रज्ञ व अभियंते यांना गांधी कृषी विज्ञान केंद्र (जेकेव्हीके) आणि इतर ठिकाणी संशोधनासाठी जागा या करारानुसार उपलब्ध केल्या जाणार आहेत. युएएसबी जैन इरिगेशनला कार्यशाळा, परिषद, सेमिनार यामध्ये भाग घेण्यासाठी निमंत्रण देईल. जैन इरिगेशनच्या संशोधकांना युएएसबीमध्ये पदव्युत्तर, विद्यावाचस्पती (पीएचडी) करता येणार आहे. युएएसबी आणि जैन इरिगेशन संयुक्तपणे शास्त्रीय अभ्यास व विस्तार यासाठी प्रयत्न करतील. प्रात्यक्षीक युनिटसाठी जैन इरिगेशन तांत्रिक पाठींबा देईल आणि युएएसबी संशोधक यातील माहिती गोळा करतील.