जळगाव। शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन यांना जामनेर येथील पतसंस्थेतील अनियमित कर्ज प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जैन यांनी सोमवारी अतिरीक्त सत्र न्यायाधीश ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला. त्या अर्जावर बुधवारी निर्णय होणार होता. मात्र पोलिसांनी त्यांचा खुलासा सादर न केल्याने पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकरणातील आणखी तीन संशयीतानी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत.
जामनेरात 35 जणांवर जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा
सुरेश जैन यांनी 2010 मध्ये जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतून सुमारे दीड कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र ते कर्ज कोणतेही तारण न ठेवता घेतले होते. तसेच पतसंस्थेचे कार्यक्षेत्र जामनेर तालुक्यात पुरतेच मर्यादीत असताना जैन यांना कर्ज दिले होते. त्यामुळे विशेष लेखापरीक्षक दीपक अनंत अट्रावलकर यांनी 2016-17 या वर्षाच्या केलेल्या लेखापरीक्षणात ही बाब उघड झाली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर जिल्हा उप निबंधकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 जुलै 2016 रोजी संस्थेचे पदाधिकारी आणि कर्जदार अशा एकूण 35 जणांवर जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना जैन यांनी व्याजासह कर्जाची दोन कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळेस भरली होती. मात्र अनियमित कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील संशयीत युवराज राजाराम मोरे, सीमा युवराजसिंह परदेशी, सुभाषचंद्र लोढा या सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या कर्जदारांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत.