जळगाव। जैन स्पोर्टस् अकॅडमी व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 6 ते 14 वर्षांआतील मुले व मुलींकरिता उन्हाळी क्रिकेट स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे हे 14वे वर्ष असून 16 एप्रिल ते 7 मे दरम्यान करण्यात आले होते. या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरासाठी सहाशे पन्नास इच्छूक खेळाडूंनी नावे नोंदविली होती. त्यांच्यामधून 293 खेळाडूंची निवड करून त्यांना सकाळ व सायंकाळ या दोन सत्रात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षक आदी तंत्र कुशल प्रशिक्षकाकडून शिकविण्यात आले. दरम्यान, संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान शिकविलेल्या कौशल्याला अनुसरून 23 सराव सामने खेळविण्यात आले. त्यांच्यातील प्रत्येक सामन्यांतील सामनावीरास ट्रॉफी तर सर्वोकृष्ट खेळाडूंना वैयक्तिक बक्षीसे क्रिकेट साहित्याच्या स्वरूपात देण्यात आले.
कार्यक्रमात यांची होती उपस्थिती
यात सर्वोकृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोकृष्ट यष्टीरक्षक, सर्वोकृष्ट गोलंदाज व सर्वोकृष्ट फलंदाज, सर्वोकृष्ट अष्टपैलू खेळाडू पारितोषिकांचे वितरण दोन गटात करण्यात आले. सर्वोकृष्ट शिबिरार्थींस कै. आप्पासाहेब व्यवहारे यांच्या स्मरणार्थ फिरता चषक व क्रिकेटचे संपूर्ण साहित्य देऊन गौरविण्यात आले. या पारितोषिक वितरणप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, युसूफ मकरा, राजेंद्र लढ्ढा, अभय जैन, फारूख शेख, अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते. फारूख शेख यांनी प्रास्तविक केले तर शिबिराचा आढावा मुख्य प्रशिक्षक अविनाश आवारे यांनी घेतला. सूत्रसंचालन सुयश बुरकुल व वरुण देशपांडे यांनी केले. तर आभार अरविंद देशपांडे यांनी मानले.