जैन हिल्स येथे पोळा सण उत्साहात साजरा

0

जळगाव । जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन व प्रात्यक्षिक विभागात कार्यरत असलेले सहकारी यांनी सातपुड्यातल्या पारंपरिक वाद्यांवर घेतलेला ताल, त्यांच्या जोडीला आदिवासी पावर्‍या नृत्यासह नंदी व मोर नृत्याचा आविष्कार, शंकर- पार्वती, हनुमानासह लोककलेत रुळलेली सोंगे त्यांच्यासाथीला दिमाखात निघालेल्या बैलजोड्यांची मिरवणूक अशा पारंपरिक वातावरणात वर्षभर शेतीसाठी कष्ट घेणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा जैन हिल्स येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अथांग जैन, ज्योती जैन, अनुभूतिच्या संचालिका निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन, वरिष्ठ कृषी संशोधक डॉ. बाला, सिंगापूर येथील सिलास्टेन, डॉ. बाल कृष्ण, डॉ. अनिल ढाके, व्यवस्थापक संजय सोनजे आदी उपस्थित होते. जैन हिल्स येथील बैलजोड्यांची व इतर पशुधनाची मान्यवरांच्या हस्ते पूजा करून त्यांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जैन गुरुकुल येथे अशोक जैन यांच्यासह जैन परिवारातील स्नुषा व सदस्यांनी मनोभावे बैलजोडींची पूजा केली. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.

सर्जा राजाचा मानाचा मुजरा
जैन हिल्स येथील ध्यानमंदिरापासून सुमारे 40 बैल जोड्यांची मिरवणूक आरंभ झाली. तत्पूर्वी सालदारगडी आणि कंपनीच्या व्यवस्थापकांनी मारुतीच्या मंदिरात विधीवत पूजन करून नारळ फोडले. भाऊंच्या समाधीस्थळी तसेच श्रद्धा धाम येथे बैल जोड्या नेण्यात आल्या. समाधीस्थळी एका जोडीतील एक बैल थबकला. बराच वेळ तो समाधीस्थळी बसून होता. भवरलालजी जैन यांना जणू सर्जा राजाने मुकपणे मानाचा मुजराच दिला.

विद्यार्थ्यांसह सहकार्‍यांनी धरला ठेका
कृषी संस्कृती संवर्धनाच्या कृतज्ञतेच्या सोहळ्यात अनुभूती इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांसह कंपनीतील सहकार्‍यांनी ठेका धरला. आदिवासी बांधवांनी वाजवलेल्या सांभर, सनई ही महादेवांची वाद्यांसह ढोल, थाळी, मांदल यांच्या निनादाने परिसर दुमदूमला होता. नृत्य सादर करतांना आदिवासी संस्कृतीमधील विशिष्ट शिट्यांचा आवाजही येत होता.

‘बुंबवी’ने वेधले लक्ष
शिरपुर तालुक्यातील कोळीत येथील आदिवासींनी आदिवासी पावर्‍या नृत्य सादर केले. तिरकामटा, तलवार, ठेंगा, विळा यासह शेतीपूरक अवजारांसह त्यांनी सहभाग घेतला. यात विशिष्ट तालावर त्यांच्याकडून ‘बुंबवी’ फिरविली जात होती. याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले. यासह नाशिक जिल्ह्यातील माळीवाडे येथील नंदी व मोर नृत्य कलावंतानी सादर केले. यातील सिंह आणि नंदीने सादर केलेले नृत्य आकर्षक ठरत होते.