जैवविविधता संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

0

पुणे । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात 52 वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन भरविण्यात आले आहे. यंदाची संकल्पना ‘जैवविविधता संवर्धनातून शाश्‍वत जीवनमान’ अशी असून, एकूण पाच परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि वसुंधरा विज्ञान केंद्र यांच्या वतीने दि. 16 ते 18 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पर्यावरण अभ्यासक डॉ. उल्हास राणे, सी. बी. नाईक, डॉ. ज्येष्ठराज जोशी सहभागी होणार आहेत. अधिवेशनाचा समारोप केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती अविनाश हावळ व विनय र. र. यांनी दिली. यावेळी नीता शहा, सुरेश पटवर्धन, गीता महाशब्दे व संजय मालती कमलाकर उपस्थित होते.

हावळ म्हणाले, वसुंधरा विज्ञान केंद्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विज्ञान प्रसाराचे कार्य सुरू आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेउन भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय पुरस्कार 2015 ने सन्मानित केले आहे. विविध विषयांतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ व विचारवंत यामध्ये सहभागी होणार आहेत. पुण्यातील एमकेसीएल, गर्डा केमिकल्स आणि मुंबईतील यशम या संस्थांसह इतर अनेकांनी या अधिवेशनाच्या संयोजनात सहाय्य केले आहे.

देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार
मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अ. पां. देशपांडे यांचा 16 डिसेंबरला 75वा वाढदिवस आहे. त्यांच्या विज्ञानकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर व खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

सागरी प्रजातींवर चर्चा
‘सागरी परिसंस्था’ विषयावरील परिसंवादात सिंधुदुर्गातील सागरीजीव, त्यांचा सहसंबध व नष्ट होत चाललेल्या सागरी प्रजाती या विषयी चर्चा होणार आहे. ‘शाश्‍वत शेती समस्या व उपाय’ या विषयावरील परिसंवादात बदलत्या हवामानाचा शेतीक्षेत्रावर होणारा दुष्परिणाम व त्यावर मात करून शाश्‍वत उत्पन्नासाठी शेतकर्‍यांनी केलेले उपाय यावर चर्चा होईल. बायफचे संजय पाटील यांनी पालघर, नंदुरबार येथील शेतकरी, आदिवासी यांच्यासोबत 300 हून अधिक भाताच्या जातीचे संवर्धन केले आहे. ‘महिला सक्षमीकरण कार्यक्रम’ या परिसंवादात लेखिका डॉ. वर्षा जोशी स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा उलगडणार आहेत. पुण्यातील सायन्स पार्कच्या वतीने डॉ. कान्हेरे व त्यांचे सहकारी विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे प्रयोग सादर करणार आहेत.