जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणार्‍यास दंड

0

जळगाव। सद्भावना व्यसनमुक्ती केंद्रमधील जैव वैद्यकीय कचरा बाहेर उघड्यावर टाकतांना आरोग्य निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले असता केंद्राचे संचालकांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा करीत दादागिरी करण्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता घडली. पिंप्राळा हुडको येथील सद्भावना व्यसनमुक्ती केंद्राचा जैव वैद्यकीय कचरा बाहेर उघड्यावर टाकला जात असतांना आरोग्य निरीक्षक एन. बी. धांडे यांनी रंगेहाथ पकडले. याचा रागयेवून केंद्राचे संचालक अशोक शुक्ला यांनी अरेरावी करत धांडे यांना दादागिरी केली. शुक्ला यांनी धांडे यांच्याशी हुज्जत घालून धांडे यांचा मोबाईल फेकून दिला.

संचालकाची कर्मचार्‍यांशी अरेरावी
हा प्रकार आरोग्य निरीक्षक धांडे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना फोनद्वारे कळविला. यानंतर डॉ. पाटील यांनी रामानंद पोलीसांना घडलेली घटना फोनद्वारे सांगून मदत मागितली. यानंतर रामानंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्यानंतर केंद्र संचालक शुक्ला यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागून यापुढे असे होणार नाही असा माफीनामा लिहून दिला. माफीनामा लिहून दिल्याने पोलीस कारवाई टाळून अशोक शुक्ला यांना जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याने 2 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. ही दंडात्मक कारवाईप्रसंगी आरोग्य अधिक्षक एस. पी. अत्तरदे, आरोग्य निरीक्षक आर. डी. पाटील उपस्थित होते.