जैव वैद्यकीय कचर्‍यात 20 टक्के वाढ

0

पुणे । शहरातील बायो मेडिकल वेस्टेज अर्थात जैव वैद्यकीय कचर्‍यात वाढ झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. कचर्‍यामध्ये दरवर्षी 15 ते 20 टक्के वाढ होत आहे. दरम्यान, याचे निर्मूलन करणार्‍या प्रकल्पाची महापौर मुक्ता टिळक यांनी गुरूवारी पाहणी केली.सन 2009 सालापासून मे वास्को एन्व्हर्नमेन्टल सोल्युशन्स प्रा. लि. यांच्यामार्फत या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. डिसेंबर 2016 अखेर प्रक्रिया करण्यात येणार्‍या जैव वैद्यकीय कचर्‍यामध्ये वाढ होत आहे. कचर्‍याचे वाढते प्रमाण लक्षात घेता 150 टन क्षमतेचा हा प्रकल्प अपुरा पडणार आहे. त्यामुळे त्याची क्षमता वाढवणे आवश्यक असल्याने या बाबत उपाययोजना करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त शीतल उगले, विजय शिंदे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण चौधरी, उपआरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव, उद्यान विभागाचे प्रीती सिन्हा उपस्थित होते.

आराखडा तयार करण्याचे आदेश
कैलास स्मशानभूमी येथील अनेक बांधकामेही जीर्ण झाली असून, त्या ठिकाणी स्मशानभूमीचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या ठिकाणी अद्ययावत स्मशानभूमी आणि अधिक क्षमतेचा सामाईक जैव वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प विकसित करण्यासाठी आर्किटेक्टमार्फत आराखडा तयार करण्याचे आदेशही महापौरांनी दिले.