श्रीनगर: काश्मीर खोऱ्यात दहशत निर्माण करणारा जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने श्रीनगर येथून लोनला अटक केली आहे. आज सकाळीच पुलवामामध्ये सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लस्सीपोरा येथे ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी मोहम्मद फैयाज अहमद लोन याला अटक करण्यात आल्याने दिल्ली पोलिसांना मोठे यश आले आहे. लोनवर दोन लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. शिवाय त्याच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले होते. २०१५ पासून पोलिसांना लोन हवा होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वारंट जारी केलं होतं. २००७ मध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलसोबत अतिरेक्यांची चकमक झाली होती. त्यानंतर लोन फरार झाला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती.