जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

श्रीनगर : दक्षिण काश्मीरमधील शोपियात सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले. या चकमकीत एक जवानही जखमी झाला. तसेच चकमकीदरम्यान दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी जमलेल्या जमावाला पांगवताना पोलिसांच्या कारवाईत एका छायाचित्रकारासह चार नागरिक जखमी झाले.

सुरक्षा दलांची विशेष मोहीम
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी बटमुरन गावात आल्याचे समजताच राज्य पोलिसांचे विशेष पथक, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या पथकातील जवानांनी विशेष मोहीम राबविली. सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती की गावात लपलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांसह एक स्थानिक दहशतवादीही आहे. त्याचे नाव तनवीर असल्याचे सांगण्यात आले.

जमावाकडून जवानांवर दगडफेक
सुरक्षा दलांनी एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई सुरू करताच दहशतवाद्यांच्या समर्थनासाठी काही लोक घोषणाबाजी करत घरांबाहेर पडले. स्थानिक प्रार्थनास्थळांमधून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत होते. याचदरम्यान जमावाने जवानांवर दगडफेक करून दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुरक्षा दलांनी दगडफेकीला तोंड देत दुसरीकडे कारवाई सुरूच ठेवली. यावेळी दहशतवाद्यांनीही गोळीबार सुरू केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. सोमवारपासून सुरू झालेली ही चकमक मंगळवारपर्यंत सुरू होती. या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.