मुंबई । आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सने संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी न्यूझीलंडच्या जेम्स पामेंट यांच्याकडे सोपवली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू जॉन्टी र्होड्स यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यांनी 2009 ते 2016 दरम्यान रंगलेल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षणाची धुरा उत्तमरित्या सांभाळली. मात्र, आता जॉन्टी र्होड्स यांनी वैयक्तिक कारणामुळे हे प्रशिक्षकपद सोडण्याची इच्छा दर्शवली आहे.
त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी जॉन्टी र्होड्स यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, जॉन्टी र्होड्स यांच्या मार्गदर्शनाखाली संघात एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. संघाच्या क्षेत्ररक्षणातील सुधारणांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनात संघाने यशस्वी प्रवास केला. त्यांचे परिश्रम शब्दांत सागणे शक्य नाही. नवनियुक्त प्रशिक्षकाच्या नियुक्तीबद्द्ल आकाश अंबानी म्हणाले की, जेम्स पामेंट यांनी न्यूझीलंडच्या संघात विशेष क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडली आहे.
ते मुंबई इंडियन्स संघाची धुरा योग्यरीत्या सांभाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2014 मध्ये त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेत नॉर्दन डिस्ट्रिक्ट संघाला प्रशिक्षण दिले. यावेळी त्यांच्या कामगिरीने सर्वजण प्रभावित झाल्याचे आकाश यांनी सांगितले. यंदा आयपीएल स्पर्धेचा 11वा हंगाम असून यावेळी खेळाडुंचा पुन्हा लिलाव होणार आहे. अकराव्या हंगामात प्रत्येक संघमालकांना तीन खेळाडुंना कायम राखण्याची मुभा देण्यात आली आहे.