डॉ युवराज परदेशी
जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने आपल्या कारकीर्दीत फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावून या अजिंक्यपदावर दुसर्यांदा नाव कोरले. टेनिस जगतात सर्वात यशस्वी खेळाडू म्हणून ओळखले जाणारे रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनाही हे यश अद्याप मिळवता आलेले नाही. चारही ग्रँडस्लॅमचे किमान दोन वेळा विजेतेपद पटकावणारा जोकोविच पहिला खेळाडू ठरला आहे. सर्बियाचा जोकोविच करिअरमध्ये आता 19 ग्रँडस्लॅम किताबाचा मानकरी ठरला आहे. यामध्ये त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनचे 9, फ्रेंच ओपनचे 2, विम्बल्डनचे पाच आणि अमेरिकन ओपनचे 3 वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याने करिअरमध्ये सर्वाधिक 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चॅम्पियन होण्याचा पराक्रम गाजवला आहे. आणखी एक ग्रँडस्लॅम जिंकला की जोकोविच फेडरर व नदाल यांच्या विक्रमाची बरोबरी करेल. या दोघांनी 20 ग्रँडस्लॅम जिंकलेले आहेत. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी आजवर जेवढी व्यक्तिगत ग्रँडस्लॅम जिंकली, तेवढी कोणीच जिंकलेली नाहीत. या अर्थाने तर तिघे ‘सार्वकालिक महान’ आहेतच. दर वेळी आपल्या इतक्याच दर्जेदार स्पर्धकाशी दोन हात करून या तिघांना ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकावी लागली. हे तिघेही एकाच काळात एकमेकांशी झुंजण्यापेक्षा वेगवेगळ्या कालखंडांत जन्मले असते, तर कदाचित त्यांच्या ग्रँडस्लॅमची संख्या आजच्यापेक्षा वाढलीही असती. यावरुन या तिघांचेही मोठेपण लक्षात येते. असे असले तरी जोकोविच तिघांमध्ये नेहमी उजवाच ठरतो!
टेनिस म्हटले म्हणजे स्टेफी ग्राफ, आंद्रे आगासी, पीट सॅम्प्रास, मार्टिना हिंगिस, मारिया शारापॉव्ह, स्वेत्लाना कुझेन्सॉव, ऑण्डी रॉकडीक, मार्टिना नवराल्टीवा, जिमी कॉनर्स, विनस विल्यम्स, सेरेना विल्यम्स, रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच यांची नावे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. टेनिस हा खेळ काहीसा महागडा खेळ असला तरी भारतात त्याची लोकप्रियता भरपूर आहे. शालेय स्तरापासून या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा खेळ फारसा अवघड नसल्यामुळे आपल्या देशात गावोगावी हा खेळ खेळला जातो असे म्हटले जात असले तरी यासाठी प्रचंड स्टॅमिना लागतो. अलीकडच्या काही वर्षात हा खेळ उच्चभू लोकांच्या फिटनेससाठी सर्वाधिक पसंती असलेला खेळ म्हणून देखील नावारुपाला आहे. भारतात लिएडंर पेस, महेश भुपती, सानिया मिर्झा यासारख्या खेळाडूंनी या खेळाला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत टेनिस हा आपल्या भारतीय जातकुळीचा खेळच नाही. तो खेळावा तर युरोपियन्स, अमेरिकन्स आणि ऑस्ट्रेलियन्सनी, असे अलिखित समीकरणच झाले होते. या खेळासाठी लागणारी प्रचंड ताकद, अमर्याद दम ही कामे करावी परदेशातल्या अरदांड खेळाडूंनी करावीत आपण आपले क्रिकेट खेळावे. टेनिस, फुटबॉल, अॅथलेटिक्स वगैरेंच्या वाटेला फारसे जाऊ नये, असे चित्र अनेक वर्षे कायम होते. अजूनही रोहन बोपन्ना, युकी भामरी, सोमदेव देववर्मन अशी बोटावर मोजण्याइतकी नावे सोडली तर एकही मोठे नाव समोर येत नाही. अलीकडच्या काळात बियांका आंद्रेस्कू आणि सुमित नागल या युवा खेळाडूंनीही टेनिस जगताला स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे. या खेळाकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारु शकणार नाही. मात्र जागतिक टेनिस जगतात एकापेक्षा एक मातब्बर खेळाडूंचा दबदबा दिसून येतो. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विंबल्डन आणि यू.एस. ओपन या चार स्पर्धांना ग्रँडस्लॅम म्हणतात. या स्पर्धांवर जोकोविच-राफेल-रॉजर या समकालित त्रयींनी वर्चस्व गाजविले आहे. अव्वल राहण्यासाठी अव्वल कौशल्य-तंत्र लागते. अपरिमित कष्टाची तयारी लागते. हे गुण तिघांमध्ये असल्याने तिघे अव्वल ठरतात. रॉजरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2003मध्ये सुुरू झाली. त्यानंतर 2005मध्ये राफेलने आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवर पाय ठेवला. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2008मध्ये जोकोविचची कारकीर्द सुुरू झाली. या तिघांच्या उदयानंतर ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, यूएस व विम्बल्डन या चार ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेर्यांत कोणी इतर टेनिसपटू क्वचित दिसले. यावरुन या तिघांचा दबदबा अधोरेखीत होतो. टेनिस कोर्टवर नेहमी गमती जमती करणार्या जोकोविचचे बालपण अत्यंत खडतर राहिले आहे. जेंव्हा फेडरर स्वित्झर्लंडमधील व नदाल स्पेन मधील आल्हाददायी वातावरणात टेनिस कोर्टवर घाम गाळत होते तेंव्हा जोकोविच नव्वदच्या दशकात सर्बियातल्या युद्धाची होरपळ सोसत जोकोविच वाढत होता. पाणी, दूध, ब्रेडसाठीसुद्धा लहाना जोकोविच रांगेत तासंतास उभा राहत होता. जगण्याच्या या संघर्षाने टेनिस कोर्टवरच्या जोकोविचला अधिक कणखर बनवले आहे. म्हणूनच तो सरसच ठरतो. जोकोविचकडे प्रचंड जिद्द आहे. जिंकण्यासाठी आवश्यक असणारा स्टॅमिना त्याने तासन् तास घाम गाळून कमावला आहे. याचे दर्शन त्याने फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये घडविले. 34 वर्षीय जोकोविचने अंतिम लढतीत 22 वर्षीय स्टिफानोस सितसिपासला 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 अशा सेट्सनी पराभूत केले. जोकोविचने 5 वर्षांनंतर क्ले कोर्टवर ग्रँडस्लॅम चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. त्याने 2016 मध्ये या स्पर्धेचा किताब जिंकला होता. यासह तो आतापर्यंत करिअरमध्ये दुसर्यांदा या स्पर्धेत चॅम्पियन ठरला आहे. आता दुसर्यांदा विजेतेपदाचा मानकरी होण्यासाठी त्याने क्ले कोर्टवरील किंग नदालला धूळ चारली होती. मात्र तो सर्वाधिक चर्चेत राहिला तो त्याच्या वर्तनामुळे! गेल्या वर्षी युएस ओपनमध्ये जोकोविचने रागाच्या भरात फेकलेला चेंडू लाईन पंचला लागल्याने त्याच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण टेनिस विश्व विचलीत झाले होते. यावेळी त्याने स्वत:ची चुक मान्य करत लाईन पंचची माफी देखील मागितली होती. यावरुन त्याचा मनाचा मोठेपणा सिध्द होतो. टेनिस खेळाडूंना मदत करण्यासाठी व टेनिसच्या भविष्यावर जोकोविचनने फेडरर व नदाल सोबत चर्चा केल्याने खुद्द त्याने इन्स्टाग्रामवर चॅटदरम्याने त्याचा मित्र व प्रतिस्पर्धी स्टेन वावररिंगाला सांगितले होते. यामुळे देखील जोकोविच अन्य खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. टेनिस कोर्टावर व बाहेर देखील जोकोविच बादशहाच आहे, हे त्याने वारंवार सिध्द केल आहे. अशा या दिलदार खेळाडूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!