इस्टबॉर्न (फ्रान्स) । जागतिक टेनिस क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने एगॉन इंटरनॅशनल ग्रासकोर्ट स्पर्धा जिंकत सोमवारपासून सुरू होणार्या विम्बल्डन स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने फ्रान्सच्या गाएल मोनफ्लिसचा 6-3,6-4 असा पराभव करत 2010 नंतर प्रथमच विम्बल्डन स्पर्धेआधी ग्रासकोर्ट स्पर्धा जिंकली आहे. जोकोविचचे कारकिर्दीतले 68 वे अजिंक्यपद आहे. या मोसमातील दुसरे विजेतेपद मिळवताना जोकोविचने मोनफ्लिसचा 14 व्यांदा पराभव केला. महिलांच्या एकेरीच्या लढतीत तिसरे मानांकन मिळालेल्या झेकोस्लोव्हाकीयाच्या करोलिना प्लिस्कोवाने वर्चस्व राखले. अंतिम लढतीत तीने डेन्मार्कच्या कॅरोलीना वोझ्नाइस्कीची लढत 6-4, 6-4 अशी मोडून काढत विम्बल्डनसाठी आपली दावेदारी सांगितली आहे. करोलिनाचे यंदाच्या हंगामातील हे तिसरे अजिंक्यपद आहे. गेल्यावर्षी प्लिस्कोवाला या स्पर्धेत जेतेपदाने हुलकावणी दिली होती. डॉमिनिका सिबुल्कोव्हाकडून पराभूत झाल्यामुळे प्लिस्कोवाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. प्लिस्कोव्हाकडे विम्बल्डनमधील यंदाची संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात आहे.
1सोमवारपासून रंगणार्या विम्बल्डन स्पर्धेत नव्या दम्याच्या अनेक युवा टेनिसपटूंनी आव्हान निर्माण केले आहे. मात्र ग्रासकोर्टवरील या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत स्वत: फेडरर, त्याचा मैदानावरचा कट्टर हाडवैरी रफाल नदाल, अॅण्डी मरे आणि नोवाक जोकोविच हे बिग फोरच वर्चस्व गाजवतील असा इशारा सात वेळा ही स्पर्धा जिंकणार्या रॉजर फेडररने युवा टेनिसपटूंना दिला आहे.
2मागील 14 वर्षांमध्ये या चौघांनीच विम्बल्डन स्पर्धा गाजवली आहे. फेडररशिवाय रफाल नदाल आणि अॅण्डी मरेने दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, तर नोवाक जोकोविचने तिन वेळा विजेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले आहे. 2002मध्ये स्वित्झर्लंडच्या लेटॉन हेविटचा अपवाद वगळता या चौघांशिवाय इतर कुणाला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.
3यावेळी या चौघांपैकी एक जण विजेता ठरणार असा दावा केला जात आहे. या स्पर्धेकरता या चौघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने स्वत:ला तयार केले आहे. विम्बल्डन खेळण्यासाठी नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर विश्रांती घेणेच पसंत केले. तर जोकोविचने शनीवारी इस्टबोर्न स्पर्धा जिंकून आपण विम्बल्डसाठी तयार असल्याचे दाखवून दिले. अॅण्डी मरे विम्बल्डनच्या पहिल्या सामन्यापासूनच तयार असतो.
महिलांमध्ये विजेता कोण?
विम्बल्डनमध्ये यंदा गतविजेती सेरेना विल्यम्स् आणि माजी विजेती मारिआ शारापोव्हाचे आव्हान नाही. त्यामुळे महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी चांगलीच चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे. गत उपविजेती अँजेलिक कर्बरला यावेळी पहिले मानांकन देण्यात आले असून तिच्यासमोर माजी फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन विजेत्या स्वेतलाना कुत्झनेत्सोव्हाला नमवण्याचे आव्हान असेल. दुसरे मानांकन मिळालेल्या सिमोना हालेपला ब्रिटनच्या जोहाना कोंटाचा अडथळा पार करावा लागेल. विजनिया वेडनंतर ही स्पर्धा जिंकणारी ब्रिटनची दुसरी टेनिसपटू म्हणून पाहिले जात आहे. वेडने 1977 साली ही स्पर्धा जिंकली होती.
मार्टिन क्लिझनविरुद्ध पहिला सामना
2010 मधील डेव्हिस कपच्या अंतिम सामन्यानंतर जोकोविचने आतापर्यंत 57 सामने खेळले असून त्यातील 56 सामने त्याने जिंकले आहेत. इस्टबोर्नमध्ये त्याने अंतिम फेरीत मिळवलेला विजय हा फ्रान्सच्या टेनिसपटूवर मिळवलेला सलग 19 वा विजय होता.
अंतिम लढतीत जोकोविचने एकदाही सर्व्हीस गमावली नाही. या उलट त्याने तीन वेळा मोनफ्लिसची सर्व्हिस भेदली होती. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या जोकोविचचा विम्बल्डनमधील पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझनशी सामना होणार आहे. जोकोविचने यापूर्वी तीन वेळा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले आहे.