जोखीम घेतल्याशिवाय यश नाही

0

जळगाव। यश संपादन करण्यासाठी जोखीम घेणे महत्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात जोखीम घेतल्या शिवाय यश मिळत नाही. आवाहन स्वीकारल्यास ते नक्की यशस्वी होतात . तरुणांनी आर्मी मध्ये येण्याचा विचार करावा. भारत हा असा देश आहे कि त्याच्या नावे एका महासागचे नाव जोडले गेले आहे. देशाच्या भवितव्याचा विचार फक्त तरुण पिढीच्या हातात असल्याचे प्रतिपादन भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल खान्देश सुपुत्र सुनील भोकरे यांनी केले. जळगावकरांच्यावतीने आयोजित नागरी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर कुलगुरू पी. पी. पाटील, माजी कुलगुरू डॉ. के. बी पाटील ,जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, आयुक्त जीवन सोनावणे, निशा जैन, भरत अमळकर, कॅप्टन पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्याहस्ते सम्मान
कांताई सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे यांचा उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे कुलगुरू पी. पी. पाटील यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सम्मानित कार्यक्रमात भोकरे यांनी केलेल्या देशसेवेला जळगाववासीयांनी उभे राहून सलाम दिला. सैन्यदलात सेवा देणार्‍या आर. पी .सिंग ,कॅप्टन लिमये,मोहन कुळकर्णी ,किशोर पेठकर यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.

तरुणांनी देश सेवा करावी
व्हाईस अ‍ॅडमीरल सुनील भोकरे यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, माझे बालपण हे ग्रामीण भागात अधिक प्रमाणात गेले. लहान वयातच देशसेवेचा प्रण घेतल्याने आज हे भविष्य साकार करू शकलो. वडिलांचे नियोजन योग्य असल्याने शिक्षण घेऊ शकलो. मुलाना पालकांनी मोकळीक देणे गरजेचे आहे. कोणालाही विचारल्यास सांगण्यात येते की, माझा मुलगा इंजिनियर होणार. मात्र देश सेवेसाठी माझा मुलगा आर्मीत जाईल असे म्हणताना कोणीच दिसत नाही. पाकिस्तानाशी झालेल्या युद्धाबाबत ते म्हणाले की, कारगिल युद्धात 40 दिवस आम्ही समुद्रात होतो.

सरकार नापास झाल्यास दुसरे सरकार येते. मात्र नौदलात तसे चालत नाही. तर शिस्त लागते. ग्रामीण भागातील असल्याने नौदलाच्या खडतर प्रशिक्षणादरम्यान त्याचा लाभ झाला. पुढे सैनिकी शाळेत दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शिस्त, स्वच्छता आणि वेळेचे महत्त्व समजले. जीवनात अनेक सन्मान मिळाले. व्हाईस अ‍ॅडमिरलच्या पदवीमुळे देशाचे रक्षण करण्याची संधी मिळाली आहे. सुटीनिमित्त गावाकडे आल्यानंतर आजही आपण शेतातील गुरांचे शेणपाणी करीत असल्याचे आपण सहकार्‍यांना सांगत असतो. आपल्या देशासाठी काही करावे असे वाटत असल्यास तरुणांनी सैन्यात दाखल होऊन देश सेवा करावी असे आवाहन त्यांनी केले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी भारतीय नौदलाचे व्हाईस अ‍ॅडमिरल सुनील भोकरे याच्या बाबत मनोगत व्यक्त केले. या मध्ये कुलगुरू पी. पी. पाटील यांनी समस्त खान्देशवासियांना अभिमान वाटावा असा भोकरे यांचा देशसेवेचा प्रवास आहे. प्रेरणादायी व्यक्ती महत्व असल्याने सगळ्यांनी त्यांच्या कडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले. माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना सुनील भोकरे हे आपल्यात असल्याचा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे.

देशात भ्रष्टाचार मोठया प्रमाणावर वाढलेला आहे सैनिक देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत असतो. यामुळे आपण देखील आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे यावेळी त्यांनी सांगितले.