जोगेश्‍वरी गुंफेवरील रहिवाशांचे पुनर्वसन लवकरच

0

मुंबई । जोगेश्‍वरी पूर्वेकडील गुंफेवरील रहिवाशांचे पुनवर्सन करण्यात येणार असून या पुनर्वसन प्रक्रियेतील सोडतीत गुंफेवरील मोडकळीस आलेल्या इमारतींतील रहिवाशांना प्रथम प्राधान्य द्या, असे निर्देश गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका तसेच एसआरएच्या अधिकार्‍यांना दिले. जोगेश्‍वरी पूर्व येथील गुंफेवरील व आजूबाजूच्या परिसरातील रखडलेल्या विकास योजनांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी मंगळवारी भेट दिली तसेच अधिकारी व स्थानिक रहिवाशांसोबत बैठक घेतली. या बैठकीला नगरसेवक प्रवीण शिंदे व मुंबई महानगरपालिका, पुरातत्त्व विभाग, एसआरए, म्हाडा पोलीस, विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

60 व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन
जोगेश्‍वरी गुंफेवरील काही रहिवाशांचे बोरिवली पूर्व व कांदिवली येथील लालजी पाडा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित रहिवाशांचे बोरिवली येथील चिकूवाडी येथे स्थलांतर करण्यासाठी बांधण्यात आली असूनही स्थलांतर करण्यात आलेली नाही. येथील रहिवाशांना मूलभूत सुविधांचा सामना करावा लागत आहे. 60 व्यावसायिक गाळ्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. एसआरएच्या ताब्यात येणार्‍या बोरिवली चिकूवाडी येथील सदनिका विकासकाकडून लवकर ताब्यात घ्याव्यात, रहिवाशांचे पुनर्वसन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहे.