मुंबई – जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका उपनगरीय लोकलची धडक लागून जगन्नाथ विठ्ठल नाईक या 60 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्यांची ओळख पटली नव्हती, मात्र शर्टावरुन पोलीस शिपाई एस. व्ही पाटील यांनी त्यांची ओळख पटविण्यात यश मिळविले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे. जोगेश्वरी पूर्वेला जगन्नाथ नाईक हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात.
आज सकाळी ते रद्दी घेऊन जोगेश्वरी पूर्वेहून पश्चिमेच्या दिशेने गेले होते. रद्दी दिल्यानंतर ते रेल्वे रुळ ओलांडून घराच्या दिशेने जात होते. यावेळी फलाट तीनवरुन बोरिवलीच्या दिशेने जाणार्या जलद उपनगरीय लोकलने त्यांना धडक दिली होती. त्यात त्याच्या शरीराचे अक्षरशा तुकडे झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस शिपाई एस. व्ही. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्यांचा मृतदेह पोलिसांनी कूपर रुग्णालयात पाठविला होता. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यामुळे त्यांच्या शर्टावरुन पोलिसांनी शोध सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या सूचनेनंतर पाटील यांनी तिथे येणार्या जाणार्या प्रत्येक व्यक्तीला या मृतदेहाचे फोटो दाखविले होते. यावेळी एका व्यक्तीने शर्टावरुन संबंधित व्यक्तीची माहिती दिली होती. या माहितीवरुन रेल्वे पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. यावेळी फोटोतील व्यक्ती जगन्नाथ नाईक हेच असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी कूपर रुग्णालयात धाव घेतली होती. उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी सांगितले.