जोरदार टीकेनंतर सत्ताधार्‍यांचे पाऊल मागे!

0

नवीन बांधकामांना बंदीच्या ठरावात केले फेरबदल
पंतप्रधान आवास योजना, म्हाडा, वैयक्तिक बांधकामांना मिळणार परवानगी

पिंपरी-चिंचवड : महापालिका हद्दीतील चिंचवड मतदार संघात गृहप्रकल्पांचा सुकाळ आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी असल्यामुळे चिंचवड मतदार संघात काही काळ नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचा निर्णय सत्ताधार्‍यांनी घेतला होता. या निर्णयावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपसह शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आरोपांची झोड उठवली होती. बांधकाम व्यावसायिकांना वेठीस धरण्यासाठी आणि निवडणूक फंड गोळा करण्यासाठी केवळ चिंचवड मतदार संघापुरता हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत बदल करून एक पाऊल मागे घेतले आहे. बंदीतून पंतप्रधान आवास योजना, म्हाडा, वैयक्तिक बांधकामांना वगळण्यात आले आहे.

मागील सभेत केला होता ठराव
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड मतदार संघात गृहप्रकल्पांचा सुकाळ आहे. पावसाळा सुरु झाला असून पावसाचे प्रमाण सध्या कमी आहे. यामुळे पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, ताथवडे, रावेत, वाकड, पुनावळे, मामुर्डी, किवळे इत्यादी भागात ’काहीकाळ’ गृहप्रकल्प बांधण्यास परवानगी देण्यात येणार नाही. असा ठराव मागील स्थायी समितीत आयत्यावेळी करण्यात आला होता. त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.