जोरदार पावसासह बाप्पाचे आगमन !

0

जळगाव। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे शुक्रवारी जोरदार पावसासह मंगलमय वातावरणात आगमन झाले. दुपारी 3 वाजेपर्यत निरभ्र असलेल्या वातावरणात अचानक बदल होऊन शहरात जोरदार पाऊस झाले. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान शहरात जोरदार पाऊस झाला. सर्वांनाच पावसाची प्रतिक्षा होती दरम्यान पाऊस झाल्याने भाविकांचे आनंद द्विगूणीत झाले. पावसाचा आनंद घेत भाविकांनी नाचत गाजत ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना केली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाले आहे. आता पुढील 12 दिवस ‘मोरया मोरया’चा जयघोष असणार आहे. ’आला रे आला गणपती आला,’ ‘मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात आणि ढोल-ताशांचा गजरात चैतन्य व मंगलमय अशा वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

ढोल-ताशांचा गजर
शहरात गणरायाच्या स्थापनेसाठी गणरायाच्या मिरवणुकीत ढोल व ताशांचा प्रचंड दणदणाट केला जात होता. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते ढोल-ताशांच्या तालावर थिरकत होते. मिरवणुकांमध्ये अबालवृद्धांनी सहभाग नोंदवला. बाप्पाच्या आगमनामुळे बालगोपाळांमध्येही आनंदाचे वातावरण होते. सकाळपासून बाप्पाच्या आगमनामुळे भक्तांच्या चेहर्‍यावर अपूर्व उत्साह आह फूले मार्केट ते चौबे मार्केट, बहिनाबाई उद्यान ते आकाशवाणी चौक, अजिंठा चौक ते एमआयडीसीपर्यत ठिकठिकाणी गणपती मूर्तीसह साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले होते.

‘पीओपी’ निर्मित गणेशमूर्ती
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जावा यासाठी जनजागृती करण्यात येते. गणेश मूर्ती ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरीस या पदार्थापासून बनविल्या जातात. हा पदार्थ विरघळण्यास अतिशय कठीण घटक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदुषीत होते. शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करावे अशी जनजागृती होत आहे मात्र जनजागृतीमुळे काही एक फरक पडत नसल्याचे दिसून येते. मूर्ती ह्या ’पीओपी’पासूनच बनविलेल्या होत्या. किंचीत ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती दिसून आल्या.

अनेकांना रोजगार
गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते. गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, पेढे व मिठाई खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी बाजारपेठेत झाली होती. झेंडू, गुलाबाची फुले, दूर्वा, केळीची पाने व खांब, श्रीफळ, विडयाच्या पानांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद होता. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाली. गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य विक्रीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तरुण, शाळकरी मुले यांनी पुजेच्या साहित्यासह गणेश मूर्तीची विक्री केली.

जी.एच.रायसोनीत स्थापना
शहरातील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणरायाची स्थापना संचालक प्रितमजी रायसोनी यांच्या हस्ते करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढून विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. प्रसंगी प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंखेने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. महाविद्यालयात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.

मनपात गणेश स्थापना
महापालिकेचा मनाच्या गणेश मुर्तींचे वाजतगाजत शास्त्री टॉवर चौकातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत महापालिकेचे अधिकार्‍यांसह कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता महापालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमारतीत करण्यात आली. याप्रसंगी प्रभारी महापौर ललित कोल्हे, गणेशाची स्थापना जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, स्थायी सभापती वर्षा खडके, माजी उपमहापौर सुनील महाजन, मुख्य लेखाधिकारी निरंजन सैंदाणे, प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील, पाणी पुरवठा अधिकारी डी. एस. खडके, लेखापरीक्षक चंद्रकांत वांद्रे, राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जीएसटीमूळे किंमती वाढल्या
केंद्र सरकारने 1 जुलै पासून देशभरात जीएसटी (वस्तू व सेवाकर) लागू केला आहे. त्यामुळे सर्वच वस्तूवर कमी अधिक प्रमाणात जीएसटी लागू झाला आहे. गणेशमूर्त्यांवरही 18 टक्के जीएसटीचा अधिभार असल्याने मूर्त्यांच्या किंमती वाढल्या होत्या. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी अधिक भाव वाढले आहे अशी प्रतिक्रिया सामान्य भाविकांच्या तोंडून ऐकायला मिळत होते. त्यामुळे गणेश भक्तांनाही जीएसटीची झळ पोहोचल्याचे दिसून आले.