पुणे । आपण जेव्हा एखाद्या देशाकडे किंवा समाजाकडे पाहतो. तेव्हा केवळ त्याचा नैसर्गिक भाग पहात नाही. त्या भूभागावर राहणारे लोक त्यांची संस्कृती याचा विचार केला जातो. सध्याच्या पिढीला त्या काळातील चित्रपट कसे बनविले आणि लोकांपर्यंत पोहोचविले असतील याची माहिती होणे आवश्यक आहे. जो आपला इतिहास काय आहे हे जाणून घेईल त्यालाच भविष्याचा वेध घेता येईल, असे मत पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
कलाकारांना योग्य मानधन मिळावे
आम्ही पुणेकर संस्थेतर्फे 16 एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या ऑडिटोरियमध्ये करण्यात आले होते. या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी माजी आमदार मोहन जोशी, फिक्कीचे संचालक आशिष कुलकर्णी, हेमंत जाधव, डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. मिलिंद पवार, अरविंद जडे, अखिल झांजले, मुकुंद ढवळीकर, दिनेश देशपांडे उपस्थित होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गिरीष बापट म्हणाले, कलाकारांचा केलेला सन्मान म्हणजे कलाकारांना प्रोत्साहन देणे आहे. ज्या कलाकारांनी आपली कला लोकांसमोर सादर करण्यासाठी आयुष्य वेचले त्यांना योग्य ते मानधन मिळावे.
ज्येष्ठ अभिनेत्रींचा सन्मान
मोहन जोशी म्हणाले, काही कलाकारांना मानधनाची खूप आवश्यकता आहे. गरजू कलावंतांपर्यंत मानधन पोहोचणे महत्त्वाचे आहे. जयमाला इनामदार म्हणाल्या, त्या काळातील कलावंतांनी घेतलेले कष्ट आणि आत्ताचे कष्ट यामध्ये फरक आहे. आजची पिढी भाग्यवान आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ वितरक आण्णा देशपांडे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेत्री जयमाला इनामदार, वितरक सज्जन लोहार, सतीश विसाळ, राहुल सगरे यांचा सन्मान करण्यात आला. महोत्सवात तू सुखकर्ता, आई, तांबव्याचा विष्णू बाळ, गुलछडी, बापु बिरु वाटेगावकर आदी चित्रपट दाखविण्यात आले.