जो पाजेल नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू !

0

खान्देशातील लोकसभा निवडणुकीत लोकसंघर्ष मोर्चाची अनोखी मोहिम

भुसावळ- धुळे, नंदुरबारसह जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदारांना उमेदवारांकडून पैशांसह दारूचे प्रलोभन दाखवले जावू नये तसेच या अप्रिय प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा महिला विंगतर्फे ‘जो पाजेल माझ्या नवर्‍याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ या आशयाचे फलक लावून जनजागृती केली जात आहे. निवडणुकीत मद्याचा महापूर वाहून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते शिवाय मद्य पिल्यानंतर होणारे अपघाताचे प्रमाण पाहता दारूला हद्दपार करण्यासाठी लोकसंघर्षने पुढाकार घेतला आहे. गडचिरोली येथेदेखील याच पद्धत्तीने जनजागृती केली जात असल्याची माहिती लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली.

खान्देशात करणार जनजागृती
प्रतिभा शिंदे यांनी या अनोख्या मोहिमेबद्दल माहिती देताना सांगितले की, निवडणुका या निकोप वातावरणात होणे गरजेचे आहे मात्र उमेदवार निवडणुकीत मतदारांना दारूसह पैशांचे प्रलोभन दाखवतात त्यामुळे तरुणाईसह नागरीक मद्याच्या आमिषाला बळी पडून मतदान करून या काळात व्यसनाधीनही होतात शिवाय त्यामुळे अपघातासारख्या घटना घडून प्रसंगी त्यांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे लोकसंघर्ष मोर्चा महिला विंगतर्फे जळगावसह रावेर मतदारसंघातील गावा-गावांमध्ये 23 एप्रिलपर्यंत फलक, बॅनर्स तसेच पत्रक वाटून जनजागृती केली जाणार आहे तर धुळे व नंदुरबार मतदारसंघात 28 पर्यंत जनजागृती केली जाणार आहे. उमेदवार प्रचाराल आल्यानंतर त्यालाही याबाबतचे पत्रक दिले जाणार असल्याचे शिंदे म्हणाल्या. सोशल मिडीयातून याबाबत जनजागृती केली जात आहे.