भुसावळ । विविध ज्ञानरचनावादी उपक्रम राबविणार्या सातारा जिल्ह्यातील कोरेेगाव तालुक्यात असणार्या कुमठे बीट या केंद्रातील शाळांना भेट देवून तेथील वर्गाभ्यास करण्यासाठी भुसावळ येथून 50 शिक्षक गुरूवार 19 रोजी रवाना होत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे हा अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार व डॉ.जगदीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20, 21 रोजी शाळांना भेटी देण्यात येणार आहेत.
शिक्षण आनंददायी होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज
कुमठे बीट येथील शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी आपल्या संकल्पनेतून विविध ज्ञानरचनावादी उपक्रम अनेक शाळांमधून राबविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या उपक्रमांचा आदर्श महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये राबविला असल्याने त्यांचे कार्य शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. प्रतिभा भराडे यांच्या म्हणण्यानुसार शिकणे नैसर्गिक आहे. सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दु:खद घटनांच्या अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात. मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते. विद्यार्थी नैसर्गिक पध्दतीने, स्वयंप्रेरणेने शिकले पाहिजे. त्याला अडलेल्या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी त्याच्यात जिज्ञासा निर्माण व्हायला हवी. ही जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी शिक्षकांनी त्याला शब्दकोशाचे साधन उपलब्ध करून द्यावे. पूर्वी शिक्षक शिकवायचे व विद्यार्थी शिकायचे. ज्याला येते तो हुशार आणि ज्याला येत नाही तो ढ असे म्हटले जाई. रचनावाद हा चुका मान्य करतो. चुकणं ही शिकण्याची पायरी आहे हे मान्य केले पाहिजे. लहानपणापासून मुलांशी बोलत राहिल्यास पहिलीत मूल येते तेव्हा त्याच्याकडे सुमारे तेरा हजार शब्दांचा साठा असतो. त्याचा वापर शिक्षकांनी अध्यापनात करून घेतला पाहिजे. यासाठीच त्यांनी स्वतः अंमलबजावणी केलेल्या शाळांना भेटी देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व ज्ञानासह मनोरंजन गृप यांनी केले आहे.