ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे शिक्षकांची वैद्यकिय तपासणी

0

भुसावळ। शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, नैतिक, कला यासह इतर क्षेत्रांमध्ये सुधारणावादी कार्य करुन समाजाची बौद्धिक निगा राखणार्‍या ज्ञानासह मनोरंजन गृपच्या सदस्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांच्या आरोग्याची निगा घेण्यात आली. भुसावळ येथील ज्ञानासह मनोरंजन गृपच्या तृतीय वर्धापनदिनाचे औचित्य साधून जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

तज्ञ डॉक्टरांनी केली तपासणी
यावेळी विविध प्रकारची तपासणी डॉ. रमेश मालकर, डॉ.हेमंत केळकर, डॉ. स्वप्निल, डॉ. अनुश्री अग्रवाल व डॉ.शब्बीर शेख, डॉ.दीपक अग्रवाल व डॉ. लखविंदर सिंग, डॉ. अभिजित वडगावकर, डॉ.निखिल चौधरी व रुपेश पाटील, डॉ.सोनिया कांकड यांनी केली. या शिबिरांचा लाभ 80 सदस्यांनी घेतला. समारोप कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना प्रा.शैलेश राणे व कांचन राणे यांच्या हस्ते सेवाव्रती गौरव मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन दिलीप वैद्य यांनी केले. अध्यक्षस्थानी गोदावरी पाटील तर व्यासपीठावर बी.आर. पाटील, लक्ष्मण महाराज, प्रा. व.पु. होले, शांताबाई पाटील, संजू भटकर यांची उपस्थिती होती.

तीन वर्षात पंधरा उपक्रम
प्रास्ताविकात ज्ञानासह मनोरंजन गृपचे प्रमुख डॉ.जगदीश पाटील यांनी गृपने गेल्या तीन वर्षात राबविलेल्या विविधांगी पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देवून गृपसदस्यांच्या सहकार्याने सर्वांच्या व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. प्रा. शैलेश राणे, दिलीप वैद्य, प्रा. व.पु. होले व प्रमोद आठवले यांनी आरोग्य तपासणी उपक्रमाचे कौतुक करून डॉ. उल्हास पाटील यांच्या कार्याचा तर गोदावरी पाटील यांच्या मूल्याधिष्ठीत संस्काराचा गौरव केला. सूत्रसंचालन उपशिक्षक शैलेंद्र महाजन यांनी तर आभार प्रा. निलेश गुरूचल यांनी मानले.