अधिकमासानिमित्त पारायण व कीर्तन महोत्सव
नवी सांगवी : मनुष्याची भ्रांतीमान अवस्था नष्ट करण्यासाठी व अंधारात चाचपडणार्या व्यक्तींना उजेडात आणण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला दिले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतील एक जरी ओवी आपण अनुभवली तर लौकीक जीवनात आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन पुणे विद्यापिठाचे माजी अधिष्ठाता व आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे माजी अध्यक्ष डॉ. प्राचार्य शिवाजीराव मोहिते यांनी केले. कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्यावतीने अधिकमास पुरुषोत्तम पर्वकाळ निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी डॉ. मोहिते उपस्थित भाविकांसमोर त्यांनी आपले विचार मांडले.
पारायण सोहळ्याचे उद्घाटन जगद्गुरू डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व त्यांच्या पत्नी कविता यांच्याहस्ते कलश पूजन करण्यात आले. वीणा पूजन वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव बाजीरावनाना चांदिले, देहु विठ्ठलवाडी येथील संतोश काळोखे, कासारवाडी येथील साईदत्त आश्रमाचे स्वामी शिवानंदमहाराज, बब्रुवाहन वाघमहाराज, नामदेवराव फापाळे, प्रेममहाराज नारायण, सुदाम महाराज तायडे व प्रतिमा पूजन मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, बाळासाहेब मोरे, ध्वज पूजन मधुकर संधान, विजय जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका निर्मला कुटे, जिल्हा परिषद सदस्या मंगल भेगडे, नगरसेवक संतोश कांबळे, जयनाथ काटे, आत्माराम नवले, मोहन भेगडे, नानासाहेब भोंडवे, बापुसाहेब काटे, शैलजा घोडके उपस्थित होते.
ज्ञानेश्वरीला अनुभवले पाहिजे
डॉ. मोहिते पुढे म्हणाले की, ज्ञानेश्वरीचे नुसतेच पारायण करून चालणार नाही, तर त्यातील शब्द नी शब्द आपण अनुभवला पाहिजे. किंबहुना जगला पाहिजे. सुखी संतोशाने यावे ! दुःखी विशादा न भजावे ! लाभा लाभ न धरावे मनामाजी या सारख्या अनेक ओव्यांनी सर्व समुदायाचे जीवनच उजळून टाकले आहे. जीवन सुजलाम सुफलाम करायचे असेल तर संतांचे महात्म्य आचरणात आणावे लागेल. रामकृष्ण मंगल कार्यालयात सात दिवस चालणार्या या सप्ताहात दररोज सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी महिला भजन तर सायंकाळी कीर्तन यासारखे धार्मिक उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती संजय जगताप यांनी दिली.