आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे पंढरीला जाण्यासाठी 17 जूनला हरिनाम गजरात माऊली मंदिरातून प्रस्थान होणार आहे. श्रीचे पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास 9 जुलैला सुरू होईल. आळंदी देवस्थानमध्ये पालखी सोहळा-2017 साठीचे नियोजनपूर्व आढावा घेण्यासह पालखी सोहळ्याचे कार्यक्रम वेळापत्रक, श्रींचा नैवेद्य, मोकळा समाज, दिंड्यादिंड्यांची उतरण्याची जागा, पालखीतळ नियोजन, स्वच्छता, अधिकृत अनधिकृत दिंड्या समस्यां, भाविक, वारकरी सेवा सुविधा, वाहतूक, वाहन पास, ध्वनी प्रदूषण, सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम यासाठी बैठक झाली. यावेळी दिंडी चालक, मालक, व्यवस्थापक, प्रमुखांची बैठक प्रथमच अनेक वर्षानंतर पंढरपूर ऐवजी आळंदी मंदिरात झाली.
पंढरपूरऐवजी आळंदीला बैठक
या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक, विश्वस्त विकास ढगे, योगेश देसाई, चोपदार राजाभाऊ रंधवे, रामभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष मारुती कोकाटे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,पालखी सोहळ्यातील दिंडी चालक, मालक, व्यवस्थापक, फडकरी आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर(पवार), राजेंद्र आरफळकर उपस्थित नव्हते. बैठकीत आळंदी देवस्थान व दिंडी प्रमुख यांचेत विविध विषयावर चर्चा होऊन श्रींचे पालखी सोहळ्यातील नियोजन,आढावा, सेवा सुविधा बाबत त्रुटी समस्यां, अडचणी समजून घेत त्यावर समाधानकारक तोडगा, सूचना तसेच यापूर्वीच्या चुका दुरुस्त करीत सोहळ्याचे वैभवात वाढ करण्यास सुसंवाद साधला गेला. श्रींचे पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले.
प्रदीर्घ चर्चेनंतर नियोजन
यावेळी काळानुरूप सोहळ्यात, दिंडीत होणारे बदल आणि दिंडी प्रमुख यांचेकडून स्वयंसेवक म्हणून प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त करीत चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी मार्गदर्शन करत सुसंवाद साधला. माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत यावर्षी शनिवारी 17 जूनला सायंकाळी चारच्या सुमारास श्रींचे वैभवी पालखीचे प्रस्थान होणार आहे. श्रींचे पालखी सोहळ्याचे महत्त्व ओळखून श्रींचे वारी सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी पंढरपूर येथील बैठक रद्द करून आळंदी माऊली मंदिरात रविवारी झाली. या बैठकीत दिंडी समाज संघटना, सोहळ्यातील मानकरी, सेवक चोपदार आळंदी देवस्थानचे पदाधिकारी आणि पालखी सोहळ्यातील मानकरी, फडकरी यांच्यातील प्रदीर्घ चर्चा नंतर कार्यक्रम सुसंवाद साधून तयार करण्यात आला आहे.
वैभवी पालखी सोहळ्याचा हरिनाम गजरात प्रवास
17 जूनला अलंकापुरीतील माऊली मंदिरातून श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम आळंदी देवस्थानने नव्याने विकसित केलेल्या दर्शनबारी मंडपात जुन्या गांधी वाड्यातील जागेत होणार आहे. 18 रोजी सोहळा पुण्यनगरीकडे मार्गस्थ होणार आहे. 18 व 19 ला दिवसांचे पाहुणचारानंतर 20 रोजी सोहळा पुढील दोन दिवसांच्या मुक्कामास सासवड येथे पोहोचणार आहे. 21चा मुक्काम पाहुणचार घेत सोहळा 22 ला जेजुरीत मुक्काम होणार आहे. 23ला वाल्हे, 24 ला श्रींचे नीरा स्नान झाल्यानंतर मुक्कामास लोणंद येथे हरिनाम गजरात सोहळा दीड दिवसाचे मुक्कामास पोहचणार आहे.
चांदोबाचे लिंब येथे पहिले उभे रिंगण
25 रोजी चांदोबाचे लिंब येथे पहिले उभे रिंगण झाल्यानंतर सोहळा मुक्कामास तरडगावला जाणार आहे. पाहुणचार घेऊन 26 जूनला तरडगावहून फलटण विमानतळ येथे मुक्काम होईल. 27ला बरड,28ला नातेपुते, 29 ला पहिले गोल रिंगण झाल्यानंतर सोहळा माळशिरस येथे मुक्कामी पोहचेल. 30 रोजी खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण झाल्यानंतर वेळापूरला मुक्कामास सोहळा हरिनाम गजरात येणार आहे. वेळापूर येथील पाहुणचार घेत श्रीचा वैभवी पालखी सोहळा ठाकूरबुवाची समाधी येथील तिसरे गोल रिंगण घेत मुक्कामास जाण्यापूर्वी टप्पा येथे संत सोपानदेव यांची बंधुभेट घेत भंडीशेगावला 1 जुलैला जाईल. 2 ला श्रींचा वैभवी पालखी सोहळा बाजीरावाची विहीर येथे दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण झाल्यानंतर वाखरीच्या मुक्कामास पाहुणचार घेईल. आळंदीतून 17 जूनला प्रस्थान झाल्यानंतर हरिनाम गजरात सोहळा ठिकठिकाणी मुक्काम घेत आपले दैवत श्री पांडुरंगरायांचे भेटीस 3 जुलैला पादुकांचे जवळ आरती व तिसरे उभे रिंगण झाल्या नंतर पंढरपूरला पोहचणार आहे.
नियोजनाबाबत आवाहन
4 जुलैला श्रींचा वैभवी पालखी सोहळा हरिनाम गजरात पंढरपूर नगरीत नगर प्रदक्षिणा श्रींचे चंद्रभागा स्नान करीत एकादशी साजरी करणार आहे. सहा दिवसांचा ज्ञानभक्तिमय पाहुणचार मुक्काम घेत श्रींचा सोहळा 9 जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुख्मिणी भेट, गोपाळपुरात काला होईल. त्यानंतर पंढरपूरातून परतीचे प्रवासास सुरुवात पादुकांजवळ विसावा घेत परतीचे प्रवास सुरू होणार आहे. वाखरीत पहिला परतीचे प्रवासातील मुक्काम घेणार आहे. भाविक वारकरी, दिंडी चालक-मालक,व्यवस्थापक यांनी अधिकृत कार्यक्रमाची खात्री करून पालखी सोहळ्याचे पत्रिका तयार कराव्यात आणि सोहळ्यातील धार्मिक महत्त्व लक्षात घेत श्रीचे वैभवी सोहळ्याचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्रींचे मंदिरासह आळंदी नगरपरिषदेत सोहळ्याचे तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे.