विद्यालयाचा निकाल 95 टक्के
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी संचालित ज्ञानेश्वर विद्यालयात 17-18 शैक्षणिक वर्षाचा दहावीचा निकाल 95.96 टक्के जाहीर झाला. यामुळे संस्थाचालक, नागरिक, पालक, शिक्षक वर्गातून मुलांचे कौतुक करण्यात आले. आळंदी विद्यालयात प्रथम क्रं. विजय जाधव 92.60 टक्के, द्वितीय क्रं. प्रथमेश ताडलवार 91.80, तृतीय क्रं. हर्षदा वहिले 91.40 टक्के यांना मिळाल्याने पालकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. तसेच सीमा खराद या विद्यार्थिनीने 90 टक्के गुण मिळवून पुणे जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, मुख्याध्यापक गोविंद यादव, उपमुख्याध्यापिका छाया गायकवाड, पर्यवेक्षक यांनी अभिनंदन केले. तसेच श्वेतांबर जैन स्थानक संघाच्यावतीने इयत्ता बारावी कॉमर्स एम.आय.टी कॉलेजमध्ये 87 टक्के गुण मिळविले. यामुळे गुणवंत विद्यार्थिनी ठरल्याबद्दल आकांक्षा वडगावकर यांचा उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक सत्रात आकांक्षाचे आईचे निधन झाले असताना तिने विशेष प्राविण्य मिळविले. आळंदी परिसरातून या यशाचे कौतुक केले जात आहे. येथील आळंदी जनहित फाउंडेशनचेवतीने उत्तीर्ण विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.