ज्युनिअर कॉलेजमध्ये बायोमेट्रीक हजेरी

0

नागपूर : प्रतिनिधी – खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात येणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली. शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्‍न विचारला होता. याप्रश्‍नावर उत्तर देताना तावडे यांनी ही घोषणा केली. खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणार्‍या कायद्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार करण्याकरीता शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याचीही माहिती तावडे यांनी सभागृहाला दिली.

महाविद्यालये, क्लासेसचे साटेलोटे
अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात, मात्र वर्गात हजेरी लावत नाहीत. ते खासगी क्लास लावून परीक्षा देतात. अनेकवेळा महाविद्यालये आणि क्लासचे साटेलोटे असते. क्लासमुळे विद्यार्थ्यांची महाविद्यालयांत गैरहजेरी असते. ही गैरहजेरी टाळणे तसेच खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्याची मागणी, सातत्याने होत होती. त्यावर सरकारने कायदा करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

पुण्यात प्रायोगिक तत्वावर सुरूवात
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि अहमदनगर महापालिका हद्दीतील महाविद्यालयांना 2015 पासूनच बायोमेट्रीक हजेरी, खासगी क्लासवर नियंत्रण ही योजना लागू करण्याचे आदेश दिले होते. विद्यार्थी नियमितपणे वर्गात न बसणे, अध्यापनाचे काम सरकारी नियमानुसार न होणे, ऑनलाइन अ‍ॅडमिशन यादीच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे, बोगस पटसंख्या दाखविणे अशा गंभीर बाबी शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यांना आळा घालण्यासाठी बायोमेट्रीक हजेरीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात केली होती.