ज्येष्ठांना तीन लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त?

0

अर्थमंत्रालयाकडून चाचपणी सुरु

नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, आता तीन लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अधिकारी चाचपणी करत असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. 60 ते 80 वर्ष वयोगटातील ज्येष्ठांना 3 लाख 50 हजार रुपये उत्पन्नापर्यंत सूट मिळेल, अशी शक्यता आहे. सध्या सगळ्याच करदात्यांना 2 लाख 50 हजारांपर्यंत सूट मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट तीन लाख रुपये आहे.

तूर्त तीन पर्यायांवर विचार सुरु..
2019 साली होणार्‍या निवडणुकांपूर्वी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प मध्यमवर्गाला सुखावणार, असे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. त्यामुळे त्यात कररचनेत बदल करणे अशक्य असल्याने आताच हे बदल केले जातील, अशी शक्यता आहे. करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या तीन पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे. दुसर्‍या पर्यायात ज्येष्ठ नागरिकांना चार लाखांपर्यंत तर त्यापुढील वयोवृद्ध नागरिकांना सहा लाखांपर्यंत सूट देण्यात यावी, असाही प्रस्ताव आहे. तिसर्‍या एका प्रस्तावानुसार नियमित करदात्यांना 2 लाख 80 हजारांपर्यंत, तर वरिष्ठ आणि अतिवरिष्ठ नागरिकांना आणखी 30 हजार रुपये सूट देण्याचाही प्रस्ताव आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसकट 50 हजार रुपये सूट देण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालयाचे अधिकारी आणि अर्थतज्ज्ञ यांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयाकडे हे तीनही प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले जाणार आहेत.