जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रमात कार्यक्रम
पुणे : आजी-आजोबांसाठी विद्यार्थिनींनी सादर केलेली गीते, नृत्य, पोवाडे, नाटक यांचे कौतुक करीत ज्येष्ठ नागरिकांच्या चेहर्यावर हास्य फुलले. बंगाली ग्रुपने सादर केलेले नृत्य, अंताक्षरी, जादूचे प्रयोग अशा वेगळ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद ज्येष्ठांनी लुटला. नाट्यवाचन, भारुडाद्वारे आपली कला सादर करण्यात ज्येष्ठ नागरिक दंग झाले. ज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खराडी येथील अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रम व सिनिअर एक्सप्रेस यांच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्र. न. गोळे, कुंदा वर्तक, दिलीप काळे, राहुल भाटे, निवृत्त कर्नल गौरव सिंग, डॉ. निधी मिश्रा, उदीप कुलश्रेष्ठ, संदीप गव्हाणे उपस्थित होते.
विविध शाळांमधील तसेच संस्थेतील कर्मचार्यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी गीते, नृत्य, कविता, पोवाडे यांचे सादरीकरण केले. बंगाली ग्रुपच्या नृत्याला दाद मिळाली. देशभक्तीपर गीते, कोळीगीते अशा विविध गीतांवर आजी-आजोबांनी ठेका धरला. विद्यार्थिनींनी लो. टिळकांवर पोवाडाही सादर केला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनी सादर केलेल्या नाट्यवाचनाने उपस्थितांची मने जिंकली. आजींनी नणंद-भावजय यांच्यातील गमतीशीर भांडण दाखवित भारुड सादर केले. जादूच्या प्रयोगांमधून ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या लहानपणच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपने सादर केलेल्या संगीताच्या कार्यक्रमाने वातावरण संगीतमय झाले.